पुणे : तूरडाळीच्या(pulses) दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत. अपुऱ्या पुरवठ्यामुळे मागील वर्षभरापासून तूरडाळीचे दर चढेच आहेत. अपुरा पाऊस, काढणीला झालेला अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे.
आठवडाभरात तूरडाळीच्या(pulses) दरात प्रतिकिलो सरासरी पाच रुपयांनी वाढ होऊन तूरडाळ १८० ते १८५ रुपये किलोंवर गेली आहे. चणाडाळीच्या दरात सरासरी चार रुपयांची वाढ झाली असून ती ८५ ते ९० रुपये किलोंवर आहे. मूगडाळीचे दर १३० ते १५० रुपये किलो, तर उडीदडाळीचे दर १४० ते १५० रुपयांवर गेले आहेत.
अपुरा पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनात घट झाली आहे. तुरीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे दर तेजीत आहेत. सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही तुरीची खरेदी सरासरी नऊ ते १० हजार रुपयांनी सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तुरीपासून डाळ तयार करताना कमी उतारा मिळत आहे.
बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर बारा हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी – मार्च महिन्यात १० हजार रुपयांवर असलेल्या तुरीच्या दरात एप्रिलमध्ये दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कृषी पणन मंडळाच्या माहितीनुसार, शनिवारी अमरावती बाजार समितीत लाल तुरीला सरासरी ११,८००, जालना (पांढरी) ११,३७६, अकोला १२,०७५, नागपूर ११,८४२, छ. संभाजीनगर १०,८०० आणि परतूरमध्ये ११,१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
हेही वाचा :
उद्धव ठाकरेंना एकाच दिवसात दोन धक्के
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच, बंद खोलीत चर्चा