माळशिरस : काळ्याभोर ढगांची झालर… टाळ मृदंगाचा गजर…(dark glasses) माउलीनामाचा जयघोष… लाखो भाविकांच्या नजरा… अश्वांची नेत्रदीपक दौड… अशा भक्तिरसात चिंब झालेल्या वातावरणात सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे रंगले. माउलींच्या अश्वांनी तीन फेऱ्या मारून रिंगण पूर्ण केले. रिंगणातील आनंदोत्सवात न्हालेल्या लाखो वैष्णवांमध्ये चैतन्य बहरले.

नातेपुतेकरांचा निरोप घेऊन सकाळी पालखी सोहळा मार्गस्थ झाला.(dark glasses) त्यापूर्वी पहाटे तळावर सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी माउलींच्या पादुकांची महापूजा केली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. सकाळच्या प्रहरी ढगाळ हवामान होते. आज सोहळ्यातील पहिले रिंगण होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.
सकाळी काकड्याचे अभंग गात सोहळा साडेआठच्या सुमारासच म्हणजे तासभर लवकर मांडवी ओढ्याजवळ विसाव्यासाठी थांबला. परिसरातील भाविकांनी रांग लावून दर्शन घेते.(dark glasses) दुपारी दिंड्यांमध्ये पंगती झाल्या. काही वारकऱ्यांनी शेजारील वाहत्या पाण्यामध्ये आंघोळी केल्या. दुपारी बारा वाजता सोहळा मांडवी ओढ्यावरून मार्गस्थ झाला. रणरणत्या उन्हात वाटचाल सुरू होती.
हरिनामाचा गजर करीत पालखी रथ साडेबाराच्या सुमारास रिंगणाजवळ आला. रथापुढील दिंड्यांमधून पालखी गोलाकार आखलेल्या रिंगणातून जाऊ लागली. ‘माउली-माउली’ नामाचा अखंड जयघोष सुरू झाला. दिंड्यांमधून वाट काढीत दुपारी एक वाजता पालखी मधोमध येऊन विसावली. त्यानंतर भोपळे दिंडीतील पताकाधाऱ्याने रिंगणात धावण्यास सुरुवात केली. काही मिनिटांत पताकाधाऱ्यांच्या तीन फेऱ्या झाल्या. लगोलगच दोन्ही अश्व धावले. त्यांनी कधी बेफाम वेगात तर कधी दबकत तीन फेऱ्या पूर्ण केल्या.
यावेळी लाखो भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. ‘माउली’ नामाचा एकच घोष झाला. अश्वाच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. रिंगण संपल्यानंतर दिंड्या उडीच्या खेळासाठी पालखीजवळ आल्या. टाळमृदंगाचा आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा एकच गजर झाला. त्या ठेक्यात उपस्थित भाविकांनीही ठेका धरला. रिंगण आणि उडीच्या खेळाने वारकऱ्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले. पावणेसहा वाजता पालखी सोहळा समाजआरतीनंतर माळशिरस मुक्कामी विसावला.
वाटचालीत…
मांडवी ओढ्यापासून सदाशिवनगरपर्यंत रस्ता दुभाजकातील झुडपांच्या सावलीत वारकऱ्यांचा विसावा
पुरंदवडे येथील रिंगण पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची उड्डाणपुलावर प्रचंड गर्दी
दुपारपर्यंतच्या वाटचालीत रणरणते उन्हात वाटचाल
अनेक दिंड्यांचा बाह्यवळण मार्गावर मुक्काम
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..