शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका असलेला कुठलासा एक मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी पडदा गाजवून गेला होता. एक विहीर चोरीला जाते अशी त्या चित्रपटाची कथा होती. विशेष म्हणजे विहीर चोरीला गेली आहे, हे लेखी पुराव्यासह चित्रपटाचा नायक न्यायालयात सिद्ध करतो. विहीर कागदोपत्री खोदली जाते, ती कागदावरच राहते. मंजूर झालेले पैसे कुणाच्यातरी हातात, खिशात जातात. या विहिरीची गोष्ट आठवणीत यायचं कारण म्हणजे, कोल्हापूर शहरातले 100 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले रस्तेच(Roads) चोरीला गेले आहेत.

कोल्हापूर शहराच आणि रस्त्यांचं (Roads)फारसं काही जमलंय असं कधी घडलेलं नाही. तसा इतिहासही नाही. खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी, नव्याने बांधण्यासाठी कोल्हापुरातील ऑटो रिक्षा चालकांचं महापालिकेला घेरावो घालण्याच आंदोलन मात्र इतिहास घडवणार आहे.

त्यानंतरही रस्त्यातील(Roads) खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याच, खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये कागदी होड्या सोडण्याच,
अशी कितीतरी अभिनव आंदोलने अधून मधून होत असतात. त्याची दखल घेऊन कधीतरी एकदा संबंधित रस्ते कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टला टाकलं जातं. त्याच्या पलीकडे काही घडत नाही आणि घडलेलं नाही.

महाराष्ट्र नगरोत्थान योजनेखाली कोल्हापूर महापालिकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. शहरातील प्रमुख 16 रस्त्यांवर हे शंभर कोटी रुपये खर्च केले जाणार होते. त्यालाही मुहूर्त लागत नव्हता. बरीच ओरड झाल्यानंतर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. रस्त्यांची निविदा प्रसिद्ध करण्यापासून, मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यापासून, वर्क ऑर्डर काढण्यापासून
कुणाच्या खिशात किती टक्के गेले याची उघडपणे चर्चाही सुरू झाली. मंजूर निधी पैकी अनेक टक्के अनेकांच्या खिशात गेल्यानंतर उरलेल्या पैशातून तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या दर्जा विषयी, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच शंका घेतली जाऊ लागली.

प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरू झाले. नेहमीप्रमाणेच रस्त्यांची(Roads) उंची वाढली आणि दोन्ही बाजूची घरे, दुकाने फूटभर खाली गेली. ओटी आणि शर्थीप्रमाणे रस्ते केले जात आहेत का याची पाहणी करण्यासाठी महापालिकेचा अभियंता रस्त्याचे प्रत्यक्ष काम चालू असताना उपस्थित होता याचे कागदोपत्री रेकॉर्ड असेल. प्रत्यक्षात या अभियंत्याला कुणा सामान्य नागरिकांनी पाहिलेले नाही. शहरातील 16 रस्ते अगदी चकचकीत झाले. वाहन चालक खुश झाले. या रस्त्यांवरून दुचाकी, चार चाकी वाहने सुसाट धावू लागली. पादचाऱ्यांनाही रस्ते पाहून समाधान वाटले. पण हे समाधान फार काळ टिकले नाही.

कधी नव्हे तो अवकाळी पाऊस मे महिन्यातच धो धो पडला. मान्सून सारखे वातावरण झाले. मे महिन्यात ओढ्या नाल्यांना पूर आला. मृग नक्षत्राच्या आधीच पंचगंगा नदी पात्रा बाहेर पडली. आषाढी एकादशीला दुसऱ्यांदा ती पात्र सोडून बाहेर आली.
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेले शहरातील सोहळा प्रमुख रस्ते हळूहळू उखडू लागले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात डांबरा खालील खडी बाहेर आली.

जुलै महिना उजाडला आणि रस्त्यात(Roads) खड्डे पडू लागले, रस्त्याला तडे जाऊ लागले. खडीवर टाकलेला डांबराचा थर हळूहळू दिसेनासा होऊ लागला. अजून पावसाच्या कोसळधारा पडायच्या आहेत, संततधार वृष्टी व्हावयाची आहे. आणि रस्त्यांची मात्र वाट लागलेली आहे. नव्याचे नऊ दिवस म्हणतात, पण तयार केलेले रस्ते 9 आठवडे सुद्धा टिकलेले नाहीत. रस्ते खड्ड्यात गेलेले नाहीत तर ते चक्क चोरीला गेलेले आहेत. कारण शंभर कोटी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते दिसतच नाहीत. याचा अर्थ ते चोरीला गेलेले आहेत.

जवाहर विहिर योजनेतील मंजूर झालेल्या विहिरी जशा अनेकदा चोरीला जातात तसे रस्तेही चोरीला जाऊ लागले आहेत. कोणत्याही प्रश्नांवर कोणत्याही योजनेवर अगदी तातडीने”व्यक्त”होणाऱ्या संघटनांनी, व्यक्तींनी, माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी यापैकी कोणीतरी शहरातील रस्ते चोरीला गेले आहेत याबद्दलची फिर्याद पोलीस अधीक्षकांकडे करावी किंवा थेट न्यायालयात करावी. रस्त्यांची चोरी झाली आहे याबद्दलचे पुरावे देण्यासाठी संबंधितांनी मकरंद अनासपुरे यांचा तो चित्रपट जरूर पहावा. रस्ते चोरीस गेल्याचा गुन्हा जरूर सिद्ध होईल.

हेही वाचा :

Tinder, Bumble वर बनावट प्रोफाइलद्वारे तरुणांची फसवणूक; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!