कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हे वरूण राजा, फक्त आज एक दिवस तू विश्रांती घे, उघडीप दे! अशी विनंती करत, प्रार्थना करत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आज सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत(Procession) सहभागी झाली. गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक तरुण मंडळे, तालीम संस्थांच्या इमारती, रस्त्यावर उभारलेल्या भव्य मंडपात गणेशोत्सवाचा सळसळणारा उत्साह होता. हाच उत्साह घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते श्री विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते.
प्रशासनाने निश्चित केलेल्या पारंपरिक मिरवणूक मार्गावर श्री विसर्जनाची मिरवणूक(Procession)पाहण्यासाठी भक्तिमय जनसागर उसळला होता. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारनंतर एकसंघ भव्यता प्राप्त झाली. पारंपारिक वाद्ये, लेझीम, मर्दानी खेळ, झांज आणि ढोल पथके, बॅन्जो, ढोल ताशा, सनई चौघडे, धनगरी ढोल, टाळ मृदुंग, हलगी, अशा विविध प्रकारच्या वाद्यांसह निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत महिलांनी झिम्मा आणि फुगडी चा फेर धरून परंपरेचा, संस्कृतीचा एक प्रकारचा कल्लोळ उडवून दिला होता. या मिरवणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने, महापालिका प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती. एकूणच असा हा अभूतपूर्व उत्साहाचा कल्लोळ सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री, मध्यरात्री आणि पहाटेच्या पुढेही चालूच होता.
सकाळी आठ वाजता सुरू झालेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 22 तासानंतर समाप्त झाली. रात्री बारा वाजता जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी ध्वनीवर्धकावरून वाद्य वाजवण्याची वेळ समाप्त झाली आहे असे सांगितल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात मिरवणुकीचा आवाज बंद झाला. आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणूक पुढे चालत राहिली.
यंदाच्या श्री विसर्जन मिरवणुकीत लेसर शो ला प्रतिबंध करण्यात आला होता. तथापि तथापि पोलीस प्रशासनाची बंदी झुगारून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मिरवणुकीत लेसर शो आणला होता. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कडून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले जात होते. डॉल्बी, डीजे यांचा दणदणाट मिरवणुकीत चालूच होता. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बिंदू चौक शिवाजी चौक चर्मकार लेन पापाची चिक्की हा पर्याय मिरवणूक मार्ग स्वीकारला होता. त्यामुळे या मार्गावरही मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा प्रचंड गर्दी उसळली होती.
किरकोळ कारणावरून खून
……………………………..
बिंदू चौक ते शिवाजी चौक मिरवणुकीचा दणदणाट सुरू असतानाच आराम कॉर्नर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाचा दुसऱ्या एका तरुणाने चाकूने भोसकून खून केला. खुनाचा हा प्रकार मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. मृत झालेल्या तरुणाचे नाव इमरान मुजावर असून संशयित आरोपीचे नाव युसुफ असलमजीत आहे. आराम करणार येथे खाद्य विक्रीची गाडी लावण्याच्या वादातून हा खून झाला असल्याचे समजते.
विसर्जन मिरवणुकीत खून होण्याची गेल्या काही वर्षातील ही तिसरी घटना आहे. 1985 च्या दरम्यान रंकाळ वेस परिसरात गुंड्या लाड याचा त्याचा भाऊ माऊ लाड यानेच चाकूचे सभासप वार करून खून केला होता. दुसरी घटना ही श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत घडली होती. निवडणुकीत साईराज जगताप याची हत्या तर सम्राट कोराने याच्यावर प्राण घातक हल्ला झाला होता.
त्यानंतरची मंगळवारी घडलेली इमरान मुजावर खूनाची तिसरी घटना घडली आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी आणि मृत हे दोघेही त्याच परिसरात राहणारे आहेत. मंगळवारी रात्री सीपीआर रुग्णालयात मुजावरच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी गर्दी केली होती. आराम कॉर्नर परिसरातही खळबळ उडाली होती. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपीला जागेवरच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा:
आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर
सर्वसामान्यांना दिलासा नाहीच; कांद्याचे दर वधारले, लसणाचीही तेजी कायम
आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर