कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शरद पवार गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(political issue) प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून ते पक्ष नेतृत्वाकडे करत होते. त्यांची मागणी थेट मान्य करण्यात आलेली नाही, मात्र त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शरद पवार यांच्या” शिंदेशाही”चा किती प्रभाव पडणार हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील हे आपणाला पदमुक्त करा असे सातत्याने म्हणत होते. विधान सभेच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारल्यानंतर, आता नजीकच्या काळात आपला पक्ष सत्तेत येऊ शकत नाही याची खात्री झाल्यानंतर जयंत पाटील हे”सत्ता नसताना पक्ष चालवणे अवघड आहे”असे वारंवार बोलून दाखवत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महायुतीचे सरकार (political issue)आल्यानंतर जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर अशी चर्चा अधून मधून होत होती. त्यातच भारतीय जनता पक्षाने आपल्या वाटणीचे एक मंत्रिपद आजही राखून ठेवले आहे आणि ते जयंत पाटील यांच्यासाठीच आहे अशी एक राजकीय चर्चा तेव्हा मोठ्या आवाजात होत होती. पण जेव्हा अशी चर्चा व्हायची तेव्हा जयंत पाटील हे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असा खुलासा करायचे.
गेल्या सात आठ महिन्यांपासून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफुस सुरू होती. आमदार रोहित पवार यांच्याकडून”पक्षाने माझ्यावर एखादी जबाबदारी टाकली पाहिजे”असे म्हटले जात होते. त्यांचा डोळा प्रदेश अध्यक्ष पदावर होता. जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असे वातावरणही तयार झाले होते. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नुकताच वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी मला आता प्रदेश अध्यक्ष पदातून मुक्त करा अशी जाहीरपणे मागणी शरद पवार यांच्याकडे केली होती.
तेव्हा, सर्वांशी चर्चा करतो आणि मग निर्णय घेतो असे पवार यांनी स्पष्ट केले होते. जयंत पाटील यांची मागणी शरद पवार यांनी थेट मान्य केली असती तर त्यांच्याकडून जयंत पाटील यांचा राजीनामा(political issue) येण्यापूर्वीच नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली असती. पण तसे घडलेले नाही. जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष राजीनामा दिल्यानंतर नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. जयंत पाटील यांचा उत्तराधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली तर मी ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो असे शिंदे यांनी त्यांची निवड होण्यापूर्वीच काही दिवस आधी म्हटले होते.

शशिकांत शिंदे हे दक्षिण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते होते. त्यांचा प्रभाव त्यांच्या विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित आहे. पण तरीही खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात ते असल्यामुळे त्यांचे नाव मीडियात येत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अविभाजित असतानाही तो पश्चिम महाराष्ट्र मर्यादित अशीच त्याची ओळख होती. या पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेतल्यानंतर हा पक्ष राज्यपातळीवर आला. आणि त्यातही मोठी फूट पडल्याने शरद पवार हे तसे एकाकी पडले. पण तरीही शिल्लक राहिलेला पक्ष हा पुन्हा नव्याने उभारणी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत चांगले यश प्राप्त केले. त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येणार असे वातावरण तयार झाल्यानंतर शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर भविष्यात मोठी जबाबदारी (मुख्यमंत्री पदाची) दिली जाईल असे सूचक वक्तव्य केले होते. पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे अपयश आले. त्यानंतर जयंत पाटील हे निराश झाले होते.
सत्ता नसताना पक्ष कसा चालवायचा हे मोठे आव्हान असल्याचे ते बोलून दाखवू लागले. त्यातूनच त्यांच्या विरोधात अप्रत्यक्षपणे रोहित पवार(political issue) उभे ठाकल्यानंतर ते फारच अस्वस्थ होते. आता प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे ते मोकळे झाले आहेत. त्यांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी काय असेल हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. या एकूण पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या शिंदेशाही कडून महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभाव पडेल हे नजीकच्या काळात समजून येईल.
हेही वाचा :
महापराक्रमाचा इतिहास आता जागतिक पटलावर
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार, टॅक्स वाढवावा लागेल