शिवसेना शिंदे पक्षाच्या जवळपास 5 खासदारांचा(tickets) पत्ता कट झालाय. त्यामुळे शिंदे पक्षाच्या आमदारांची धाकधूक वाढलीय. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय होणार? हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले, मुख्यमंत्री बनले. शिंदेंनी शिवसेना सोडली तेव्हा जे 13 खासदार शिंदेंसोबत होते त्यापैकी तिघांची तिकिटं कापली गेलीत. आणखी दोघांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सर्व्हेत शिंदेंच्या काही खासदारांबाबत मतदारसंघात तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं गेलं आणि शिंदेंना उमेदवार बदलावे लागले..
यवतमाळमधून खासदार(tickets) भावना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही. अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झाला. रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही संधी मिळाली नाही. नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईतून गजानन कीर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितला. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील मानेंना उमेदवारी मिळाली खरी मात्र आता उमेदवार बदलला जाण्याची चर्चा आहे. भाजपच्या सर्व्हेमुळेच शिंदेंच्या खासदारांना फटका बसला हे उघड आहे. त्यामुळेच सर्व्हेवर शिंदे पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जातेय.
खासदारांची तिकिटं कापल्यामुळे आमदारही अलर्ट मोडवर गेलेत. जे अनेक टर्म निवडून आलेल्या खासदारांसोबत घडू शकतं तेच आमदारांसोबत घडायला वेळ लागणार नाही, अशी भावना शिंदे पक्षातल्या आमदारांमध्ये वाढू लागल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेना शिंदे पक्षाचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंशी संपर्क करतायत असा दावा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.
एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा 13 खासदार त्यांच्यासोबत आले. मात्र त्यापैकी काही खासदारांचा पत्त कट करण्याची आणि जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की मुख्यमंत्री शिंदेंवर ओढवलीय. मुख्यमंत्री असतानाही जागावाटपावर भाजपचाच दबदबा आहे. त्यामुळे हे चित्र पाहून शिंदेंसोबत आलेल्या 40 आमदारांना धडकी भरलीय अशी चर्चा आहे. त्यातूनच मोठी राजकीय उलथापालथ होऊन राज्यातील समीकरणं बदलू शकतात अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या भावात दररोज बदल
अल्लू अर्जुनचा एकदम जबरा लूक; ‘पुष्पा २’चे नवीन पोस्टर लॉन्च
स्वतःसाठी दररोज एक तास द्या, निरोगी आयुष्यासाठी डॉक्टरांचा सल्ला