नागपूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या(New Year) स्वागतासाठी अवघे नागपूर शहर सज्ज झाले आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून नागरिकांच्या आनंदला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनीही कंबर कसली आहे.
अनेक तरुण-तरुणी उत्सवाच्या नावावर मद्यप्राशन करून रस्त्यावर गोंधळ घालतात. तर काही हुल्लडबाज भरधाव वाहन पळवून स्वतःसह दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालतात. त्यामुळे पोलिसांची मद्यपींसह हुल्लडबाजांवर करडी नजर राहणार आहे. असा कुठलाही प्रकार आढळला तर त्या व्यक्तीला संपूर्ण रात्र थेट पोलिस लॉकअपमध्ये घालवावी लागणार आहे.
सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. या दरम्यान कोणीही रॅश ड्रायव्हिंग, मद्यप्राशन करून वाहन चालविताना, हुल्लडबाजी करताना किंवा छेडखानी करताना आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरात थर्टीफस्टला ठिकठिकाणी हॉटेल्स, पब, क्लब, बिअर बार, ढाबे आणि फार्महाऊसमध्ये दारू पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते.
मद्यप्राशन करून तरुण-तरूणी नव्या वर्षाचे(New Year) स्वागत करतात. त्यामुळे शहरात अपघात, भांडण, वाद, प्राणघातक हल्ले आणि अन्य गंभीर स्वरुपाच्या घटना घडतात. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात तब्बल 5 हजार पोलिसांचा फौज-फाटा तैनात असणार आहे. प्रत्येक वाहनचालकांची ‘ब्रीथ अॅनालायझर’ मशीनने तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहनांचीसुद्धा झडती घेण्यात येईल.
पोलिस आयुक्तांनी सांगितले की, पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. दारूमुळे केवळ अपघातच होत नाही तर महिलांची छेडछाड आणि खुनासारख्या घटनाही घडतात. शहरातील सर्व हॉटेल आणि रेस्टॉरेंट संचालकांना विना परमिट दारू विकताना आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या भागात होणारा कोणताही वाद किंवा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांची सूचना देण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
दारूविक्रीवर कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आलेली नाही. परमिट असलेले हॉटेल किवा रेस्टॉरेंट पहाटे 5 वाजतापर्यंत दारूची विक्री करू शकतात. मात्र, अवैधरित्या दारू विकणे, अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी नियमांचे भान ठेवूनच नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.
हेही वाचा :
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाचे नवे पोस्टर लवकरच होणार रिलीज?
हत्येची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा…. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा थेट घणाघात
वर्षाचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी ठरणार खास; 31 डिसेंबरपासून नशीब उजळणार