विधानसभेच्या निवडणुकीच्या(of election) मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रचाराला अधिक धार मिळत आहे. मुंबईमध्येही महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनेक प्रमुख नेते आता जाहीर सभा आणि भाषणांच्या माध्यमातून विरोधकांना चितपट करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच सोमवारी मालाडमध्ये झालेल्या जाहीर प्रचारसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांना इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. ‘आहात तिथेच राहा, इथे तुमचं काही काम नाही,’ असा खोचक सल्ला फडणवीसांना ओवैसींना दिला आहे.
सोमवारी फडणवीसांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या प्रचारासाठी मालाड येथे जाहीर सभा घेतली. फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये महाविकास आघाडीसह असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ओवैसी यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी इशारा दिला होता. ओवैसींच्या या आव्हानाला फडणवीसांनी मालाडमध्ये बोलताना उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यावरुन हा वाद सुरु झाला. मुंबईतील एका जाहीर सभेमध्ये फडणवीसांनी, मागील निवडणुकीमध्ये (of election)आपण व्होट जिहाद पाहिला. मागील निवडणुकीमध्ये त्यांच्या धार्मिक स्थळांवर बॅनर्स, पोस्टर्स लावून त्यांच्या लोकांना एवढं सांगण्यात आलं की केवळ मोदीजींना हरवायचं आहे असं सांगून मतं घेतली. मात्र आता व्होट जिहादचं उत्तर व्होटच्या धर्मयुद्धाच्या माध्यमातून देणार आहोत, असं म्हटलं होतं.
फडणवीसांच्या या विधानाला ओवैसींनी आव्हान दिलं. “ऐ देवेंद्र फडणवीस तू माझ्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही. तुझ्याबरोबर मोदी आणि शाह आले तरी ते माझ्या तोंडाला तोंड देऊ शकत नाही. धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहे हे नियमांविरोधात नाही का याबद्दल राज्याच्या निवडणूक आयुक्तांनी खुलासा करावा,” असं ओवैसी यांनी म्हटलं होतं.
ओवैसींच्या या विधानावर फडणवीसांनी मालाडच्या सभेतून आव्हान दिंल. “माझ्या हैदराबादमधील भावा जिथे आहेस तिथेच राहा इथे येऊ नको. इथे तुमचे काही काम नाही. इथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहे. इथे येऊन औरंगजेबाचे गुणगान गायले जात आहे. मी सांगून ठेवतो भारतातील खरी मुस्लिम व्यक्तीसुद्धा औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. औरंगजेब तर आक्रमणं करायचा,” असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी, “अरे सुन लो ओवैसी, अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पाकिस्तान पर,” अशी घोषणा दिली.
फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये अमली पदार्थ तस्करांविरोधात आपली भूमिका ठाम असल्याचं सांगितलं. स्वत:ला ‘देवा भाऊ’ म्हणून संबोधत उपमुख्यमंत्र्यांनी अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्यांवर कारवाई करणार असल्याचे अधोरेखित केलं. ‘एक हैं ते सुरक्षित हैं’ अशी घोषणा देत फडणवीसांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
भाजपचे आशिष शेलार यांनी या भागात विशेषत: मुस्लिमबहुल मालवणी भागातील ड्रग्जशी संबंधित चिंतेबद्दल भाष्य केलं. निवडणुकीनंतर अंमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्रीसंदर्भातील कारवाया संपुष्टात आणण्याचे वचन विनोद शेलार यांचे बंधू असलेल्या आशिष शेलार यांनी दिले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी काँग्रेस आणि स्थानिक आमदार अस्लम शेख यांच्यामुळेच मालाडचा विकास होत नसल्याची टीका करत विनोद शेलार यांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं.
हेही वाचा :
‘चल आपण एकत्र काम करुयात,’ Zomato च्या CEO ने थेट सोशल मीडियावरुन तरुणाला दिली ऑफर
मी एकटा मुख्यमंत्री ज्याचं मुंबईत घर नाही…फडणवीसांचं भावनिक आवाहन
अमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले ‘आमच्या नादाला…’