ठाकरे गटाचे फायर ब्रँड भास्कर जाधवांची घुसमट

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : उबाठा सेनेचे फायर ब्रँड म्हणून ओळखले जाणारे, कोकणातील बिनीचे शिलेदार आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून(politics) निवृत्त होण्याची केलेली भाषा ही त्यांच्या मनातील घुसमटीतून आलेली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेतील काही जणांना ते आता नकोसे झाले आहेत .

विनायक राऊत, संजय राऊत, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव असा एक सुप्त संघर्ष सेनेत आहे. सेनेमध्ये ज्येष्ठ नेते असूनही
आपला योग्य तो सन्मान राखला‌ जात नाही, सेनेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही अशी एक खंत त्यांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे(politics)यांच्याकडूनही त्यांना गृहीत धरले जाते. म्हणूनच राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत त्यांच्याकडून दिले जात आहेत.

भास्कर जाधव हे चिपळूण मधून तसेच खेडमधून विधानसभेवर निवडून जातात. आमदार होण्याची त्यांची ही आठवी खेप आहे. महाविकास आघाडीचे सरकार (politics)आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तेव्हा भास्कर जाधव यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले होते. शिवसेनेला त्यांनी एकदा जय महाराष्ट्र केला होता आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस आघाडीच्या मंत्रिमंडळात भास्कर जाधव यांना शरद पवार यांनी स्थान दिले होते. पण तिथेही ते फारसे रमले नाहीत, ते पुन्हा शिवसेनेत आले.

मीडियाला मुलाखत देताना “शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यात माझी चूक झाली”अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिल्यानंतर सेनेतील त्यांचे विरोधक ऊठून बसले. राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यात चूक झाली या एकाच वाक्याचे त्यांच्या विरोधकांनी भांडवल सुरू केले. भास्कर जाधव हे शिवसेना सोडणार आहेत किंवा सोडण्याच्या तयारीत आहेत असे वातावरण त्यांनी केले होते मात्र मी कोणत्याही स्थितीत शिवसेना सोडून अन्य पक्षात जाणार नाही असे ठामपणे त्यांनी सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना मातोश्रीवर बोलावून घेऊन त्यांची समजूत काढते आवश्यक होते. पण ठाकरे यांनी या एकूण विषयावर कोणत्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही.

विधानसभेच्या(politics) विद्यमान सभागृहात महाविकास आघाडीतील इतर दोन घटकांपेक्षा ठाकरे शिवसेनेचे आमदार संख्येने जास्त आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या नावाला मान्यता देण्यात यावी असे पत्र आघाडीच्या वतीने विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आले असले तरी महायुती सरकारने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. नारायण राणे यांचाही भास्कर जाधव यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यास विरोध आहे. ठाकरे सेनेतील काही आमदारांना विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांच्या ऐवजी सुनील प्रभू हवे आहेत.

संभाव्य विरोधी पक्ष नेते म्हणून ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांना राजकीय भूमिका मांडण्यास संधी दिली जात नाही. संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्यानंतर आपणच सर्वेसर्वा आहोत अशा अविर्भावात मीडियासमोर दररोज येत असतात. भास्कर जाधव हे फायर ब्रँड आहेत. त्यांची भाषणे आक्रमक असतात. विधिमंडळात त्यांची भाषणेपिन पॉईंटेड असतात. पण दुर्दैवाने सेनेमध्ये त्यांचा योग्य तो सन्मान राखला जात नाही.

भास्कर जाधव हे पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण शरद पवार यांचा प्रभाव कमी झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातही ते जाऊ शकत नाहीत. फार फार झाले तर ते अजित दादा पवार यांच्या गटात जाऊ शकतात. पण ही जर आणि तर ची गोष्ट आहे.

सद्यस्थितीत त्यांनी आपल्या मनातील घुसमट व्यक्त केली आहे, भास्कर जाधव यांच्यासारखा नेता गमावणे हे ठाकरे शिवसेनेला परवडणारे नाही. कमकुवत बनलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेत जेष्ठ नेत्यांना अपमानित केले जाते असा एक संदेश सर्वसामान्य जनतेत जाऊ नये याची खबरदारी उद्धव ठाकरे यांनीच आता घेतली पाहिजे.

हेही वाचा :

ठरलं तर मग! ‘हा’ अभिनेता सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये साकारणार मुख्य भूमिका

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींना बंपर लाभ, लक्ष्मी कृपेने घरात येईल पैसा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिन आणि सामाजिक न्याय दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींकरिता आरोग्य शिबिर संपन्न