कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : समस्त जैन धर्मीयांचे “अतिशय क्षेत्र” म्हणून नांदणी मठ हा पंचक्रोशीत आणि दक्षिण महाराष्ट्रात एक अध्यात्मिक आणि धार्मिक केंद्र म्हणून सुपरीचीत आहे. गेल्या काही दिवसांपासून नांदणीचा हा मठ गाजतो आहे, सर्वधर्मीयांच्या चर्चेत येतो आहे, आला आहे तो तेथील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीनीचे(Elephants) काय होणार? या जिव्हाळ्याच्या प्रश्नाने. शेवटी या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वांच्या हृदयात कालवा कालव झाली.

तिला गुजरात मधील “वनतारा” कल्याण केंद्रात तातडीने पाठवण्याचा निर्णय झाला तेव्हा पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या प्रतिक्रियांना विरहाच्या वेदनेची झालर होती. पण न्याय व्यवस्थेवर विश्वास असलेल्या नांदणी जैन मठ व्यवस्थापनाने महादेवी(Elephants) वरचा हक्क सोडण्याचा निर्णय घेतला आणि सोमवारी तिला नटवून, सजवून निरोप दिला तेव्हा तिच्याही डोळ्यात आलेले आसू पाहून तिला निरोप देण्यासाठी, तिला अखेरचे पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला अश्रू अनावर झाले. महादेवी च्या निमित्ताने भारतीय वन्यजीव कायद्यातील दुधा भाव समोर आला. त्यातील अ संवेदनशीलता अधोरेखित होऊन पुढे आली.
वन्यजीव कायदा 1972 अन्वये भाग एक ते चार मध्ये वन्य प्राण्यांना सूचीबद्ध करण्यात आले आहे. त्यातील नोंदणीकृत उभयचर, जलचर, सरपटणाऱ्या जीवांना पाळता येत नाही. त्या प्राण्यांच्या अधिवास असलेल्या भागात मानवी हस्तक्षेपास मनाई करण्यात आली आहे. गंमत अशी आहे की, कोल्हापूर शहरात शुक्रवार पेठेतील सरदार घराणे असलेल्या गायकवाड यांनी चक्क बिबट्या पाळला होता. त्यांनी एका युवतीवर प्राणघातक हल्ला सुद्धा केला होता. पण जिल्हा प्रशासनाने गायकवाड कुटुंबीयांना बिबट्या पाळण्यास परवानगी दिली होती. वन्यजीव कायदा अस्तित्वात आल्यानंतरही हा बिबट्या गायकवाड कुटुंबाकडे होता. तो नैसर्गिक रित्या मरण पावल्यानंतर वन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
डॉक्टर प्रकाश आमटे यांचा विदर्भातील हेमलकसा प्रकल्प देशातच नव्हे तर पश्चिम आशियाई देशांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांना मॅगसेसे हा आशियाई नोबेल समजला जाणारा पुरस्कारही मिळाला आहे. भारत सरकारने पद्म पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. त्यांनी आपल्या निवासस्थान परिसरात बिबट्या, अस्वल, अजगर, माकडे, हरीण असे अनेक वन्यजीव पाळले आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एक नोटीस पाठवून, तुम्ही सूचीबद्ध असलेल्या यादीतील वन्यप्राणी पाळलेले आहात.
हा वन्यजीव कायदा 1972 अन्वये गुन्हा आहे. हे प्राणी तुम्ही आमच्या ताब्यात द्यावेत किंवा त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करावे अशी नोटीस बजावली होती. तथापि त्यांनी मला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देताना जे मानपत्र दिलेले आहे त्यामध्ये मी पाळलेल्या वन्य जीवांचाही उल्लेख आदराने केलेला आहे. त्यामुळे हे मी पाळलेले प्राणी सोडून द्यायचे झाले तर मग मला पद्मश्री हा किताब भारत सरकारकडे परत द्यावा लागेल असे स्पष्टपणे सांगितल्यानंतर हे अधिकारी माघारी गेले होते. आजही डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याकडे हे वन्यजीव आहेत.

माधुरी उर्फ महादेवी ही हत्तीण(Elephants) नांदणी जैन मठाने गेल्या अनेक वर्षांपासून पाळली होती. तिची अतिशय जिव्हाळ्याने देखभाल केली जात होती. ती या मठाचे एक आकर्षण होती. पंचक्रोशीतील लोक तिच्यावर प्रेम करत होते. ती सुद्धा या मठाची एक भाग बनून राहिली होती. तिने कुणाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नव्हता आणि नाही. हत्तीनं पाळण्याची या मठाची धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरा आहे.
तिचा कोणत्याही प्रकारे छळ केला जात नव्हता.” पेटा”या संस्थे व्यतिरिक्त अन्य कोणाचाही ती असण्याबद्दलचा विरोध नव्हता. पण तरीही तिला गुजरात मधील वनतारा कल्याण केंद्राकडे पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. तिथेही
तिची देखभाल केली जाणार आहे, पण तशी ती नांदणी मठातही केली जात होती. फक्त जागा बदलली आहे इतकेच. पण लोक भावाने ऐवजी न्यायालयाने वन्यजीव संरक्षित कायद्याला प्राधान्य दिलेले आहे. त्याबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही.
सोमवारी महादेवीला(Elephants) निरोप देताना अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. खुद्द महादेवीला सुद्धा मठ सोडावयाचा नसावा, कारण तिच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. नांदणी आणि पंचक्रोशीतील लोकांनी विशेषतः महिलांनी एखाद्या सासरी निघालेल्या माहेरवाशीनीला जसा निरोप देतात तसा निरोप दिला. तिला जेव्हा विशिष्ट प्रकारच्या वाहनात चढवण्यात आले तेव्हा संयम सुटलेल्या लोकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. संताप व्यक्त केला.
स्वातंत्र्यपूर्वकाळात वन कायदा 1927 हा अस्तित्वात आला. राखीव वन, संरक्षित वन आणि ग्राम वन यांच्या संरक्षणासाठी हा कायदा होता. नंतर 1972 मध्ये वन्यजीव कायदा पारित करण्यात आला. या कायद्याचा आधार घेऊन वनविभागाने देशातील आणि महाराष्ट्रातील सर्कस चालकांना त्यांच्याकडील वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचे आदेश दिले.
सर्कशीत माणसाळलेले हे वन्यजीव जेव्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले तेव्हा ते तेथील वातावरणाची जुळवून घेऊ शकले नाहीत. प्रतिकारशक्ती हरवून बसलेले हे वन्यजीव काही महिन्यातच मृत्युमुखी पडले. वास्तविक सार कशी मध्येच त्यांना मरेपर्यंत ठेवले गेले असते तर अनर्थ घडला नसता. आज वन्यजीव हे नव्या पिढीला लहान मुलांना चित्रात दाखवावे लागतात. गुजरातमध्ये असलेल्या वनतारा कल्याण केंद्रामध्ये महादेवीची उत्तम प्रकारे देखभाल होईल यात तीळ मात्र शंका नाही पण नांदणी मठ परिसरातील लोकांना महादेवीची याद कायम येत राहील.
हेही वाचा :
बाप रे बाप… बाप व्हायचंय? या ठिकाणी मिळतेय 30 दिवसांची सुट्टी
शेअर बाजाराची सुरुवात मंदावणार, आज पुन्हा घसरण होण्याची शक्यता!
आशिया कप स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामना रद्द होणार नाही! दोन कारणं समजून घ्या