‘सूर्या’ उगवला; मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली

मुंबई(MI) इंडियन्सच्या ताफ्यात अखेरीस सूर्यकुमार यादव दाखल झाला आहे. ज्याचा व्हीडिओ मुंबईने सोशल मिडियावर शेअर केला आहे.


मोठ्या प्रतिक्षेनंतर सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स(M) संघात दाखल झाला आहे. मुंबईने सोशल मिडियावर सूर्यकुमारचा व्हीडिओ पोस्ट करत ही माहिती दिली. मुंबईने पोस्ट केलेल्या या व्हीडिओमध्ये सूर्या कारमधून उतरत संघाच्या हॉटेलमध्ये जात आहे. काही दिवसांपासून सूर्यकुमार यादव संघात परत असण्याची चर्चा सुरू होती. पण आता सूर्या संघात परतला आहे, ज्यामुळे मुंबई संघाचा अर्धा ताण नक्कीच कमी झाला असेल. इतकेच नव्हे तर सूर्याने संघात दाखल होताच लगेच सरावाला सुरूवात केली आहे.
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव सहभागी होऊ शकला नाही. दुखापती आणि शस्त्रक्रियेनंतर, सूर्यकुमार यादव बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये फिटनेसवर काम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब असलेल्या सूर्यकुमारला बुधवारी एनसीएने फिट घोषित केले. फिजिओ आणि बीसीसीआयने सूर्या सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त आहे का याची खात्री करूनच त्याला हिरवा कंदील दिला


“सूर्या आता तंदुरुस्त झाला आहे. NCA च्या देखरेखीखाली त्याने काही सराव सामने खेळले आणि त्यात तो नेहमीप्रमाणे नीट खेळत असल्याचे दिसले. तो आता मुंबई इंडियन्स संघात सामील होऊ शकतो. जेव्हा सूर्या मुंबईच्या संघात परतेल तेव्हा तो १०० टक्के तंदुरुस्त असेल आणि खेळ खेळण्यासाठी तयार असेल, याची आम्हाला खात्री करून घ्यायची होती. आयपीएलपूर्वीच्या त्याच्या पहिल्या फिटनेस चाचणीदरम्यान तो १०० टक्के फिट नव्हता. त्यामुळे फलंदाजी करताना वेदना होत आहे का हे हे आम्ही तपासत होतो.” बीसीसीआयमधील एका सूत्राने ही माहिती दिली आणि अधिक माहिती देत सांगितले की सूर्यकुमारला तीन फिटनेस चाचण्या द्याव्या लागल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेतील टी-२० मालिकेदरम्यान यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती आणि सुरुवातीला तो सात आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर राहणार हे निश्चित होतं. पण त्यानंतर त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. सूर्या संघात दाखल झाल्याने बॅकफूटवर गेलेल्या मुंबईच्या संघाला अधिक बळ मिळणार आहे.

हेही वाचा :

Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु

यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग

टेस्लाने सुरू केली ‘राइट-हँड ड्राईव्ह’ गाड्यांची निर्मिती; लवकरच भारतात करणार लाँच