देश पातळीवर काही राज्य वगळली तर, उर्वरित भारतामध्ये उन्हाचा(weather) तडाखा बसताना दिसत आहे. उकाडा दिवसागणिक वाढतच चालल्यामुळं अनेकांपुढं आरोग्यासह इतरही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सध्याच्या घडीला राजस्थानपासून कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, तो मध्य महाराष्ट्रातूनच पुढं जात असल्यामुळं राज्याच्या काही भागांवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामुळं विदर्भासह मराठवाड्यातही पावसाची हजेरी पाहायला मिळतेय.
राज्यावर असणारं पावसाटं सावट(weather) पाहता विदर्भ आणि नजीकच्या पट्ट्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर, इथं तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. सध्या विदर्भातील तापमान 40 अंशांहूनही कमी झालं असून, पावसासाठी अनुकूल परिस्थिती पाहता वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांमध्ये गारपीटीसह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही अशीच काहीशी परिस्थिती असून, इथं ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील हवामानात होणारे हे बदल पाहता कोकणापासून मुंबईतही तापमानात चढ- उतारांची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असलं तरीही मुंबईत आकाश मात्र निरभ्र राहील असाही अंदाज असल्यामुळं शहराची उकाड्यापासून सुटका नाही हेच आता स्पष्ट झालं आहे.
सध्या देशाच्या बहुतांश राज्यांमध्येही उकाडा वाढत आहे. दिल्लीसह मध्य प्रदेश, राजस्थान आणि तिथं दक्षिणेकडे केरळातही उकाडा वाढत असून, येथील गिरीस्थानांवर मात्र तापमानात काहीशी घट कायम आहे. उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि उत्तराखंडमध्येही तापमानात बदल होत असले तरीही या भागांमध्ये तुलनेनं उकाडा जाणवत नाहीय.
देशाच्या राजधानी दिल्लीमध्येही पारा 41 अंशांवर पोहोचल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. पण, हवामान विभागाच्या माहितीनुसार या तापमान परिस्थितीला उष्णतेची लाट, ‘लू’ संबोधलं जाऊ शकत नाही. येत्या काही दिवसांमध्येही दिल्लीत अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हेही वाचा :
ज्यांना निवडून दिले ते बिनकामाचे निघाले;
गुजरात टायटन्सने रोखली राजस्थानची विजयी वाटचाल