कैलास रोडवर खचलेल्या रस्त्यात ट्रक अडकला; रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न

इचलकरंजी शहरातील नायरा पेट्रोल पंप कॉर्नर ते मुर्गुबाई मंदिरकडे जाणाऱ्या कैलास रोडवर आज दुपारनंतर मोठी घटना घडली. अंदाजे 40 टन वजनाचा टँकर ट्रक खचलेल्या रस्त्यातून जाताना बाजूच्या नाल्यात अडकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.


रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. ट्रक अडकल्यानंतर तात्काळ कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. अखेर, स्थानिकांच्या मदतीने ‘मीरा मूव्हर्स’ क्रेन बोलावून रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.

खचलेल्या रस्त्याचा हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. याआधीही असे अपघात झाले आहेत, मात्र आवश्यक ती दुरुस्ती किंवा संरक्षक उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी यावेळीही तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. रात्री ९.१७ च्या सुमारास ट्रकला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून अद्यापही रस्ता पूर्णपणे मोकळा झालेला नाही.

या घटनेनंतर पुन्हा एकदा कैलास रोडच्या दुरवस्थेचा मुद्दा समोर आला असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.