इचलकरंजी (दि. १२ जून २०२५) –
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्र. १३ अंतर्गत असलेल्या दातार मळा गल्ली नंबर १ व २ आणि त्यालगतच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शहर उपाध्यक्ष भाजपा श्री. उमाकांत दाभोळे यांनी महापालिका आयुक्त व प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, संबंधित भागातील पाणी पुरवठा पूर्ववत आणि नियमित करण्यासाठी नव्याने पाईप लाईन टाकण्यात यावी.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वार्ड नं. १३ मधील चौंडेश्वरी मंदिर मंदिर परिसर, मथुरा हायस्कूल रिंगरोड परिसर, लंगोटे मळा, आवाडे मळा, काडापूरे तलाव, नरेंद्र हौसिंग सोसायटी, तांबे मळा, नाईक मळा, संतमळा, गुरुकन्नानगर मठ, बरगे मळा या भागात जुन्या पाईपलाईनमुळे २० ते २५ वर्षांपासून समस्या कायम आहे. परिणामी, या परिसरातील पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होतो आहे.
महापालिकेने तत्काळ या समस्येची दखल घेऊन संबंधित परिसरात नवीन पाईपलाईन टाकावी, अशी विनंती श्री. उमाकांत दाभोळे यांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेला हा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.