दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, राज्यातील ‘या’ ८ मतदारसंघांकडे सर्वांचे लक्ष

लोकसभेसाठीचे विदर्भातील दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान आज, शुक्रवारी होत आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम आणि नागपूर (nagpur)विभागातील वर्धा या पाच मतदारसंघांतील एकूण ११४ उमेदवारांच्या भवितव्याच्या फैसल्याचा हा दिवस आहे.


म. टा. प्रतिनिधी, नागपूर(nagpur) : लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज, शुक्रवारी होत आहे. यामध्ये विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा आणि मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या मतदारसंघांचा समावेश आहे. देशातील एकूण ८९ मतदारसंघांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे.
विदर्भातील पाच मतदारसंघांत ११४ उमेदवार रिंगणात आहेत. भवितव्याच्या फैसल्याचा हा दिवस आहे. एकूण ९१ लाख ४६ हजार २९३ मतदार असून ९ हजार ९५३ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. गुरुवारी मतदान केंद्रांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांसह साहित्य पोहोचले. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात प्रचाराचा धुरळा अधिक उडाला. अमरावती, अकोला आणि बुलढाण्याची निवडणूक तिरंगी होणार असल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही राजकीय धामधूम सुरू असतानाच प्रशासनापुढे मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान आहे.

देशातील ८९ मतदारसंघांत…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आज, शुक्रवारच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान होत आहे. राहुल गांधी (वायनाड), राजीव चंद्रशेखर, शशी थरूर (तिरुअनंतपुरम), तेजस्वी सूर्या (बेंगळुरू दक्षिण), हेमा मालिनी (मथुरा), अरुण गोविल (मीरत), एच. डी. कुमारस्वामी (मंड्या) यांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांसह केरळमधील २०, कर्नाटकमधील २८, राजस्थानातील १३, उत्तर प्रदेशातील आठ, मध्य प्रदेशातील सात, आसाममधील पाच, बिहारमधील पाच, छत्तीसगडमधील तीन, पश्चिम बंगालमधील तीन तसेच मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक मतदारसंघात मतदान आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रात उद्या किती मतदारसंघात मतदान? कुठल्या भागात शाळा-कॉलेजेस बंद?

“ती सभा, ती गर्दी…”; सध्याच्या राजकीय परिस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची खास कविता

बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते म्हणाले तरी काय??