आत्याबाईला मिश्या असत्या तर? जर आणि तर ची भाषा निरोपयोगी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political news) यांनी नुकतेच एक भाषण करून काही राजकीय खुलासे केले आहेत. “आत्याबाईला मिशा असत्या तर?”अशा प्रकारचे त्यांचे हे खुलासे आहेत. जर आणि तर ची भाषा तशी निरोपयोगी किंवा निरर्थक असते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते तर शिवसेना फुटली नसती. असे ते गौप्यस्फोट केल्याच्या अविर्भावात बोलून गेले असले तरी, तेव्हाच्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी आपले नाव घ्यायला हवे होते असे ते अप्रत्यक्षपणे सूचित करतात.

इसवी सन 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांचे 84 तासाचे औट घटकेचे सरकार कोसळल्यानंतर शरद पवार यांनी महा विकास आघाडीची बांधणी केली आणि बहुमताचे सरकार आणताना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. दोन्ही काँग्रेस बरोबर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्वाचे विचार सोडून दिले. आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जाज्वल्य विचार जिवंत ठेवण्यासाठी शिवसेनेमध्ये बंड करण्यासाठी मला नेतृत्व करावे लागले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले असते तर शिवसेना फुटण्याचा प्रश्नच येत नव्हता. असे एकनाथ शिंदे हे राजकीय खुलाशात म्हणतात.

पण भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसाठी(political news) मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्यास सपशेल नकार दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसमोर उपमुख्यमंत्री पदाची ऑफर ठेवली होती. आणि मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही होती. वेगळ्या मार्गाने गेले तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळू शकते याची खात्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी राजकीय संगनमत केले. ते स्वतःच मुख्यमंत्री बनले. महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा विचार होईल असे एकनाथ शिंदे यांना वाटत होते. ठाकरे यांनी शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घेतले असते तर शिवसेना फुटली नसती असेही म्हणता येईल.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी प्रखर विचार काँग्रेस आघाडी समोर गहाण ठेवून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनले असे एकनाथ शिंदे म्हणत असले तरी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात दोन वर्षाहून अधिक काळ एकनाथ शिंदे होते हे वास्तव सुद्धा नाकारता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी गहाण ठेवले हा साक्षात्कार एकनाथ शिंदे यांना तब्बल दोन वर्षानंतर झाला. आणि त्यांनी शिवसेनेत बंड केले. ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळात शिवसेनेला
प्रतिगामी म्हणणारे अजितदादा पवार सामील झाले.

शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला अजितदादा पवार हे प्रतिगामी ठरवत असतील, किंवा तशी सातत्याने टीका करणारे अजितदादा पवार हे सत्य भागीदार नको अशी आग्रही भूमिका एकनाथ शिंदे यांनी तेव्हा घेतलेली नव्हती हेही इथे लक्षात घेतले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायचा निर्णय घेतला म्हणून तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर आरुढ होण्याची संधी मिळाली. म्हणजे ठाकरे यांच्याकडून राजकीय चूक होण्याची त्यांच्याकडून प्रतीक्षा सुरू होती असेच म्हणावे लागेल.

महाविकास आघाडीची जोडणी सुरू असताना मुख्यमंत्री म्हणून शरद पवार(political news) यांनी माझ्या नावाचे शिफारस केली असती तरी त्याला मी माझा नकार दिला असता असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले असते तर ते अधिक उचित ठरले असते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले असते तर शिवसेना फुटली नसती एवढेच ते सांगताना दिसतात. उद्धव ठाकरे हे स्वतःला मालक समजत होते. दिल्लीमध्ये शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक झाली तेव्हा ठाकरे यांनी काही जणांना फोन करून तुम्ही मालकाबरोबर राहणार आहात की नोकराबरोबर राहणार आहात असा सवाल केला होता. म्हणजे ते स्वतःला मालक समजत होते. अशाने पक्ष मोठा होत नाही. असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला आहे.

मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही पण सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस आणण्यासाठीचा माझा प्रयत्न आहे असे सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात सर्वसामान्य जनतेला सोन्याचे दिवस आले होते का असा सवाल त्यांनी स्वतःलाच एकदा विचारून पहावा. एकूणच एकनाथ शिंदे यांची भाषा जर आणि तर ती आहे आणि अशा भाषेला फारसे महत्त्व असत नाही. “आत्याबाईला मिश्या असत्या तर?”अशाच प्रकारचे एकनाथ शिंदे यांचे राजकीय खुलासे आहेत असे म्हणता येईल.

हेही वाचा :

‘या’ गाड्यांवर दंडात्मक कारवाई करणार; RTO चा इशारा

राष्ट्रीय खेळाडूचा जिममध्ये मृत्यू वेट उचलताना रॉडखाली मान दबली video viral

महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणाऱ्या महिलांनो सावधान! तुमचे फोटो होतायेत व्हायरल