मनसेच “राज”किय महत्व उपद्रव मूल्या मुळे वाढतंय!

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला(politics) बरोबर घेणार नाही असे स्पष्टपणे सांगून शरद पवार यांनी दोन्ही गटाच्या एकत्रिकरण चर्चेला पूर्णविराम दिला आहे. तर दोन्ही ठाकरे बंधूंच‌ सध्या तळ्यात आणि मळ्यात सुरू आहे. आपल्या हातात कोणता पत्ता आहे याचा उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अंदाज दिला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वप्रथम चर्चेला तोंड फोडून आता मात्र तोंडात गुळणी ठेवली आहे. सर्वांनाच संभ्रमात ठेवले आहे. यानिमित्ताने आपल्या उपद्रव मूल्यांचा’राज”कीय फायदा घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून सुरू आहे असे म्हणता येईल.

सध्या महाराष्ट्रासमोर जे प्रश्न आणि समस्या आहेत त्याच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी माझे असलेले मतभेद किरकोळ स्वरूपाचे आहेत. असे एका मुलाखतीच्या माध्यमातून सांगणाऱ्या राज ठाकरे यांनी उबाठा सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असे सूचित केले होते.

त्यानंतर मात्र ठाकरे बंधूंच्या (politics)एकत्र येण्याच्या संदर्भात राज्यात गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनीही जे माझ्या शिवसैनिकांच्या मनात आहे, जय महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे तेच होईल असे एकदा नव्हे दोन वेळा सांगून एक आश्वासक वातावरण तयार केले आहे. त्यालाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.

दिनांक 9 मार्च 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्याकडून स्थापना करण्यात आली. त्यानंतर लगेच 2007 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले. त्यानंतर 2008 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 13 आमदार निवडून राज ठाकरे यांनी सर्वांना चकित करून टाकले होते. पुणे महापालिकेत मनसेचे 29 नगरसेवक होते तर 2012 मध्ये नाशिक मध्ये 40 नगरसेवक निवडून आणून राज ठाकरे यांनी महापालिकेवर सत्ता मिळवले होती. ठाणे महापालिकेतही तीन सदस्य होते. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवली आहे.

मुंबई शहरात मनसेचे (politics)उपद्रव मूल्य आहे. शिवाय मराठी विषय हाती घेऊन चांगले वातावरणही तयार केले आहे. आणि म्हणूनच राज ठाकरे यांच्याशी युती केली तर मुंबई महापालिकेवर सेनेची सत्ता पुन्हा येऊ शकते असा राजकीय हिशोब करून उद्धव ठाकरे यांनी मनसे बरोबर युती करण्याचे संकेत दिले आहेत किंवा त्यांना या निवडणुकीत राज ठाकरे यांची साथ हवी आहे.

उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र आले तर मुंबई महापालिका हातात घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात असे भारतीय जनता पक्षाला वाटते आहे. आणि म्हणूनच अनामिक कारणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची ताज लँड हॉटेलमध्ये भेट घेऊन तासभर चर्चा केली आणि राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणार नाहीत असे एक राजकीय चित्र तयार केले गेले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मुंबई महापालिकेत संख्याबळ वाढवायचे आहे. राज ठाकरे हे आपल्याबरोबर आले तर
ते राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकते आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीला राजकीय महत्त्व आहे. फडणवीस आणि शिंदे या दोघांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील का? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडी(politics)अडचणीत येऊ शकते आणि म्हणूनच”मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना वरचढ आहे. राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही”असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनाही हे दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नयेत असे वाटते आहे.

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील असे वातावरण गेल्या महिन्याभरापासून तयार झाले आहे. त्यानंतर होत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे राज ठाकरे यांचे महत्त्व मात्र वाढले आहे. त्यांच्या राजकीय उपद्रव मूल्याची सर्वांनाच भीती आहे. त्याचे राजकीय मूल्य पुरेपूर वसूल करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून होईल हे मात्र निश्चित.

हेही वाचा :

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधूनही घेतली निवृत्ती?

क्रिकेट विश्वात शोककळा, माजी भारतीय फिरकी गोलंदाजाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज