जून महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट(team india) स्पर्धेसाठी संघाची निवड येत्या काही दिवसांत करावी लागणार आहे. दुसरा यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलने संजू सॅमसनवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी हार्दिक पंड्याचे अपयश निवड समितीला दखल घ्यायला लावणारे आहे.
१ मे ही आयसीसीला संघ(team india) कळवण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत संघ निवड कधीही केली जाऊ शकते. ही स्पर्धा होणाऱ्या वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथील खेळपट्ट्यांची स्थितीही प्रामुख्याने गोलंदाज निवडताना लक्षात घेतली जाईल.
फिरकी गोलंदाजीत अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांच्यात चुरस असेल, मात्र अतिरिक्त वेगवान गोलंदाज निवडण्याचा विचार झाला तर आवेश खानला संधी मिळू शकते. संघ निवडीपूर्वी कर्णधार रोहित शर्मा निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी चर्चा करणार हे निश्चित आहे.
आयपीएल सुरू होण्याअगोदर हार्दिक पंड्याचे नाव जवळपास निश्चित होते. आयपीएलमधून त्याची तंदुरुस्ती तपासली जाणार होती; परंतु तो फलंदाज तसेच गोलंदाज म्हणूनही अपयशी ठरत आहे. मुंबई इंडियन्सच्या आतापर्यंत झालेल्या ८ सामन्यांतून त्याने १७ षटकेच गोलंदाजी केली आहे.
एरवी आक्रमक फलंदाजी करणाऱ्या हार्दिकला केवळ सातच षटकार मारता आलेले आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १४२ एवढाच आहे. याच वेळी चेन्नई संघातून खेळणारा शिवम दुबे कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आठ सामन्यांतून २२ षटकार मारलेले आहेत. त्याला प्राधान्य मिळू शकते, मात्र गोलंदाज म्हणून त्याचा वापर आयपीएलमध्ये झालेला नाही. त्यामुळे निवड समिती त्याच्या गोलंदाजीबाबत अनभिज्ञ आहे.
प्रमुख यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड निश्चित आहे. या आयपीएलमध्ये तो ३४२ धावा करून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा स्ट्राईक रेट १६१ एवढा आहे. दुसरा यष्टीरक्षक निवडण्यासाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन यांच्यात चुरस असेल, पण त्यात राहुल सध्या तरी आघाडीवर आहे.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि आवेश खान यापैकी एकाची निवड होऊ शकते. अक्षर फलंदाजीतही उजवा असल्यामुळे त्याचे पारडे जड आहे.
हेही वाचा :
संजयकाका पाटलांना मोठा धक्का, विशाल पाटलांनी भाजपचे 4 शिलेदार गळाला लावले
चंद्रहार पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ; मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
दिल्ली उच्च न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात याचिका; आज होणार सुनावणी