रवीची किरणे आणि मशाल निवडणुकीत “उजेड” पडणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर आपली निवड व्हावी म्हणून गेल्या चार-पाच वर्षांपासून “देव पाण्यात घालून” बसलेल्या रविकिरण इंगवले यांना अखेर “मातोश्री” चे आशीर्वाद लाभले. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांना विश्वासात न घेता ही निवड करण्यात आल्यामुळे स्वागत कमी आणि प्रतिक्रिया जहाल व्यक्त होऊन लागल्या आहेत. नाराजीच्या एकूण पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत(elections) रविकिरणांचा आणि मशालीचा उजेड पडणार काय या प्रश्नाचे सुस्पष्ट उत्तर मिळण्यासाठी आणखी पाच ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संजय पवार आणि रवी किरण इंगवले यांच्यात सुसंवादापेक्षा विसंवादच अधिक होता. शिवसेना अखंडित होती तेव्हापासून रविकिरण यांना आपली जिल्हाप्रमुख म्हणून निवड व्हावी असे वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी संजय पवार यांच्या विरोधी कधी गोपनीय तर कधी उघडपणे मोहीमच राबवली होती.

संजय पवार हे उपनेते असल्यामुळे त्यांच्याकडे एकाच वेळी दोन पदे नकोत असे मातोश्री वरील सल्लागारांचे मत तयार झाले होते. पण या सल्लागारांनी उपनेते म्हणून संजय पवार यांचे मत घ्यायला हवे होते पण तसे काही झाले नाही. याचा अर्थ आता शिवसेनेतही काँग्रेस प्रमाणेच “हाय कमांड” ही एक नवी राजकीय व्यवस्था तयार झाली आहे.

रवी किरण इंगवले यांनी जी काही आजपर्यंत आंदोलने केली आहेत ती स्वतंत्रपणे केलेली दिसतात. संजय पवार, विजय देवणे यांच्या आंदोलनात इंगवले कधीही दिसले नाहीत. आता त्यांची जिल्हाप्रमुख पदावर निवड(elections) झाल्यामुळे मातोश्री च्या निर्णय क्षमतेबद्दलच शिवसैनिकांतून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. इंगवले यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे तीन मतदारसंघ म्हणजे संपूर्ण जिल्हा नाही.
जिल्हाप्रमुख हे पदाचे नाव असले तरी काम कोल्हापूर शहर मर्यादितच असणार आहे, अपवाद फक्त करवीर या विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा.

रविकिरण इंगवले यांच्याकडे प्रामुख्याने कोल्हापूर शहराची जबाबदारी आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची(elections) संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी इंगवले यांच्यावर सोपवलेली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला किती यश मिळणार आहे त्यावर इंगवले यांच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे. ते या महापालिकेचे सदस्य होते, पदाधिकारीही होते. त्यांच्या सुविद्य पत्नी या सुद्धा महापालिकेच्या सदस्य होत्या.

रवी किरण इंगवले हे काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेत निवडून गेले होते. त्यानंतर राजकीय महत्त्वकांक्षा वाढलेल्या इंगवले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजेश क्षीरसागर यांनी दुर्गेश लिंग्रज यांच्याकडील शहर प्रमुख पद काढून घेऊन ते इंगवले यांना दिले. पण इंगवले यांचे क्षीरसागर यांच्याशी फारसे काही जमले नाही. शिवसेना फुटल्यानंतर इंगवले हे मूळ शिवसेनेतच राहिले. त्याची बक्षिसी म्हणून त्यांना शहर प्रमुख पद देण्यात आले.

आता त्यांना बढती मिळाली आहे. या पदासाठी माजी आमदार सुरेश साळुंखे यांचे चिरंजीव अवधूत तसेच विद्यमान पदाधिकारी हर्षल सुर्वे हे इच्छुक होते(elections). सुर्वे यांनी तर इंगवले यांच्या निवडी बद्दल उघडपणे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कितीतरी शिवसैनिकांनी जहाल प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय बोलून दाखवला आहे.

जिल्ह्यातील शिवसेनेची स्थापना होऊन जवळपास 39 वर्षे झाली आहेत. तथापि सुरुवातीपासूनच या जिल्ह्यात शिवसेनेमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले होते. साळोखे बंधू विरुद्ध चव्हाण बंधू यांच्यातील वाद स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात उफाळून आला होता.

राजेश क्षीरसागर विरुद्ध संजय पवार हा वादही गाजलेला होता. शिवसेनेचे संपर्क नेते दिवाकर रावते यांच्यासमोरच शिवसेनेतील या दोन गटात राजर्षी शाहू स्मारक भवना समोर राडा झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरे गटाच्या शिवसेनेत संजय पवार विरुद्ध इंगवले हा संघर्ष सुरूच राहिला. आता तर तो कमी होण्याऐवजी वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

रविकिरण इंगवले यांचे पिताश्री प्रा. विष्णुपंत इंगवले हे डाव्या विचारसरणीचे. ते शेतकरी कामगार पक्षाचे तडफदार नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी डावा विचार सोडून उजव्या विचारांशी जवळीक साधली असती तर ते किमान दोन वेळा तरी या कोल्हापूर शहराचे आमदार झाले असते.

पण त्यांनी आपली वैचारिक बैठक आणि पक्षनिष्ठा कधीही सोडली नाही. रवीकिरण इंगवले यांना घरातून मिळालेली राजकीय पार्श्वभूमी असली तरी, काँग्रेस, शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. आत्मकेंद्रीत स्वभाव असल्यामुळे संघटन कौशल्य
त्यांच्याकडे आहे असे म्हणता येणार नाही. तसे असते तर त्यांच्या निवडीबद्दल नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या नसत्या. संघटनेत बढती मिळाल्यामुळे इंगवले यांची जबाबदारी वाढली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत(elections) ठाकरे शिवसेनेचे किती सदस्य महापालिकेवर निवडून जातात यावर त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीचे मूल्यमापन होणार आहे.

हेही वाचा :

वीज दर कमी नव्हे तर आणखी वाढणार

धावत्या बाईकवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स; VIDEO viral

येथे तीन दिवसांचा विक ऑफ, केवल चार दिवसच काम करा, कुठे लागू झाला हा नियम पाहा