कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
प्रस्थापित व्यवस्थेत अशी एक स्थिती निर्माण होते की तेव्हा काही मूठभर व्यक्ति मध्ये आपल्याकडे एक पॉवर आहे, (established) त्यामुळे आपले कोणीही वाकडे करू शकत नाही अशी भ्रामक वृत्ती तयार होते. आणि इथूनच त्याच्या गुंडगिरीला सुरुवात होते. पण परफेक्ट पोलिसिंग असेल तर गुंडगिरीचा प्रारंभ हाच शेवट ठरू शकतो. दुर्दैवाने म्हणा किंवा अपरिहार्य कारणामुळे भुरट्या गुंडाचे नामचीन गुंडांमध्ये रूपांतर होते आणि मग पोलीस हातबल होतात. सामान्य माणसाला पोलिसांविषयी भीती वाटत असेल आणि गुंडांना समाजात भय निर्माण करण्याची संधी मिळत असेल, गुंडगिरीचा आलेख वाढत जातो. या पार्श्वभूमीवर गावगुंडांना एकाच ठिकाणी बोलावून घेऊन त्यांची कडकआणि कठोर शब्दात झाडाझडती घेणे हा उपाय कमकुवत वाटू लागतो. हे केवळ कोल्हापूरचे चित्र नाही तर राज्यातील अनेक महानगरामध्ये अशीच परिस्थिती आहे.

कोल्हापूर पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिडशे पेक्षा अधिक नामचीन गुंडांना एकाच ठिकाणी बोलावून घेतले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी, प्रत्येक गुंडाला बोलावून घेऊन तेथे त्याची कुंडली सांगून इथून पुढे गुंडगिरी केली तर गाठ पोलिसांशी आहे असा दम दिला. वाढत्या गुंडगिरीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी केलेला हा प्रयोग स्तुत्य असला तरी तो परिणामकारक किंवा प्रभावी आहे हे गुंडगिरीचे प्रमाण कमी झाल्यानंतर समजणार आहे.कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरात गुंडांच्या अनेक टोळ्या आहेत. आणि त्या म्होरक्याच्या संक्षिप्त नावाने ओळखल्या जातात. आरसी गॅंग, एसटी गॅंग, एटी गॅंग, डीडी ग्रुप, जेडी ग्रुप, डॉन ग्रुप, अशी काही टोळ्यांची नावे आहेत आणि त्यांची या शहरात विलक्षण दहशत आहे.
या सर्व गुंडांच्या विरोधात शहरातील सर्वच पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, आणि (established) त्यामध्ये त्यांना जेलवारी झालेली आहे. जामिनावर किंवा निर्दोष मुक्तता झाल्यावर या गुंडांची दहशत कमी झालेली नाही उलट ती वाढलेली आहे. कारण या गुंडांना तुरुंगाची भीती राहिलेली नाही. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तांनी पुण्यातील प्रचंड दहशत असलेल्या नामचीन गुंडांना पोलीस परेड ग्राउंड वर बोलावून घेतले होते. (established) त्यांना आयुक्तांनी कठोर शब्दात समज दिली होती. तुमची गुंडा गर्दी थांबवा अन्यथा त्याचे आयुष्यभर लक्षात राहतील असे दृश्यपरिणाम दिसून येतील. असा इशारा दिला होता. पण त्यामुळे पुणे शहरातील गुंडगिरी थांबली आहे असे चित्र दुर्दैवाने आजही दिसत नाही. ज्यांचा काहीही संबंध नाही अशा निष्पाप लोकांच्या वाहनांची मोडतोड करणे, कोयते नाचवणे, वाहनांना आगी लावणे, फाळकूटगिरी करणे,अपहरण करणे, खंडणी मागणे असे प्रकार आजही चालू आहेत. पोलिसांनी तंबी दिल्यामुळे काही गुंडांनी गुंडगिरी सोडून दिली असेल पण रोज नवे नवे गुंड तयार होताना दिसतात आणि त्यांच्याकडूनच शहरातील शांतता भंग केली जाते. नवीन गुंड तयार होऊ नयेत यासाठीच्या प्रभावी उपाय योजना केल्या गेल्या पाहिजेत.
ज्या भागात दहशत आहे तेथे गुंडांना फिरवले जाते, त्यांची धिंड काढली जाते. लोकांच्या समोर त्यांची इज्जत काढली जाते. लोकांनी या गुंडांना घाबरू नये, असा एक हेतू धिंड काढण्यामागे असतो. पण या गुंडांचे चेहरे लोक लक्षात ठेवतात, आणि तो समोर दिसला लोक घाबरतात. त्यामुळे कधी कधी धिंड काढली गेल्यामुळे, त्या मागचा हेतू सफल होतो असे नाही.एखाद्या गुंडाची धिंड काढताना तो किती भयंकर आहे असे चित्र पोलिसांकडूनच तयार केले जाते. किंवा एखाद्या गुन्ह्यात गुंडाला अटक केली तर त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून दिली जाते. परिणामी या गुंडा बद्दल सर्वसामान्य जनतेला भीती वाटते. वास्तविक पोलिसांनी तसेच माध्यमांनी या गुंडांना फार महत्त्व देता कामा नये.
त्यांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. परिणामी सामान्य जनतेला कोण गुंड आहे आणि त्याचे नाव काय आहे याची माहिती मिळत नाही आणि मग त्याचे भयसुद्धा वाटत नाही. अप्रत्यक्षपणे समाजाने या गुंडांच्याकडे दुर्लक्ष केले तर, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.गुंडगिरीच्या प्रांतात पदार्पण करणारे तरुण हे सुरुवातीला हाणामाऱ्या करतात, तलवारी नाचवतात जेणेकरून पोलिसांनी आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत, त्याची समाज माध्यमांनी दखल घ्यावी असा त्यांचा त्यामागचा हेतू असतो. गुंड म्हणून परिसरामध्ये नाव झाले की मग तो आपली गॅंग तयार करतो आणि मग ही गॅंग म्होरक्याच्या संक्षिप्त नावाने ओळखली जाते.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?