राजकारणाच्या चुलीवर नक्कीच काहीतरी शिजतंय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीला जाणे, जयंत पाटील तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी एकाच वेळी आणि तेही रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेणे,सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डी लिमिटेशन या प्रलंबित विधेयकाच्या संदर्भात भूमिका घेणे, या सर्व गोष्टी योगायोगाने झालेल्या नाहीत, त्याच्या मागे एक सूत्र दिसते. (political) म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकीय चुलीवर काहीतरी नक्की शिजतंय असं म्हणण्याला वाव आहे.

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत अशी चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.आताही ते वेगळा विचार करत आहेत असे एकूण त्यांच्या हालचालीवरून दिसते. पण प्रत्येक वेळी असे वातावरण तयार झाले की ते लोकांनी विश्वास ठेवावा असा खुलासा करून मोकळे होतात. मंगळवारी रात्री आपण देवेंद्र फडणवीस यांना अधिकृतपणे भेटलो. ईश्वरपूरचे नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात आले आहे याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण वर्षा बंगल्यावर गेलो होतो. असा खुलासा त्यांनी केला आहे. एखाद्या शहराच्या नगराध्यक्षांना काही कारणे अपात्र ठरवले जात असेल तर त्यामध्ये मुख्यमंत्री थेट हस्तक्षेप करत नाहीत, हे जयंत पाटील यांना माहीत नाही असे कोणीही म्हणणार नाही. मग ते फडणवीस यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी घेऊन गेले होते का? नगराध्यक्ष अपात्रतेची एक घटना घडलेली आहे अशी माहिती देण्यासाठी केवळ ते वर्षा बंगल्यावर गेले होते का?जयंत पाटील हे वर्षा बंगल्याच्या हॉलमध्ये एकटेच बसले असताना (political) त्याच वेळी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे बडे नेते तेथे येतात हा राजकीय योगायोग नसावा.

शरद पवार गटाच्या खासदार आणि आमदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. शरद पवार गटाने एनडीए मध्ये प्रवेश करावा असे बहुतांशी मंडळींचे मत आहे. तर दोन्ही काँग्रेसचे विलीनीकरण व्हावे असे जयंत पाटील यांचे पूर्वीपासूनचे मत आहे. त्यामुळे विशिष्ट विषयावर चर्चा करण्यासाठी ही मंडळी वर्षा बंगल्यावर गेली होती असे म्हटले जाते. संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होते आहे. या अधिवेशनात एप्रिल 2026 मध्ये विशेष अधिवेशनात फेटाळले गेलेले डी लिमिटेशन विधेयक पुन्हा मंजुरीसाठी आणले जाणार आहे. हे विधेयक मंजूर करावयाचे झाल्यास दोन तृतीयांश मतांची गरज आहे आणि अशा मतांची गोळा बेरीज करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहेत.

लोकसंख्येवर आधारित हे विधेयक असता कामा नये तर ते सरसकट पन्नास टक्के जागा वाढवल्या जातील अशा प्रकारचे असले पाहिजे आणि तसे असेल तर आम्ही इंडिया आघाडी तसेच शरद पवार गट त्यावर विचार करू असे सुप्रिया सुळे यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढवायच्या याबद्दल अमित शहा हे सकारात्मक आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर पडायचे आहे आणि एनडीए मध्ये सहभागी व्हायचे आहे (political) आणि त्यासाठी सुप्रिया सुळे यांच्याकडून वातावरण निर्मिती केली जात आहे असे म्हणता येईल. गेल्या आठ दिवसातील महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलते प्रवाह लक्षात घेतले तर राजकारणाच्या चुलीवर नक्कीच काहीतरी शिजतंय असे म्हणण्यास वाव आहे.

सुप्रिया सुळे यांची पूर्वीची ताठर भूमिका आता राहिलेले आहे असे म्हणता येत नाही. कारण त्यांनी सरसकट पन्नास टक्के जागा वाढणार असतील तर आमचा विरोध असण्याचे कारण नाही असे म्हटले आहे तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे हे आश्चर्य वाटावे असे नाही. कारण ते मतदार संघातील काम घेऊन फडणवीसांना भेटत असतात. ते उघडपणे फडणवीस यांना भेटले आहेत. आता मी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांना भेटले, त्यांच्याबरोबर चहापान केले. नंतर तेजस्वी यादव यांच्या घरी आपण भोजन केले. अशा भेटी या राजकीय असतात असे नाही. एखाद्या पक्षाच्या प्रमुखांना भेटणे, त्यात कुणी हरकत घ्यावी असे नाही. सगळ्याच भेटींना राजकीय रंग लावणे चुकीचे आहे असे त्या म्हणतात. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या दालनामध्ये जाऊन भेटणे ही घटना सुद्धा सहज घडलेली आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही असा खुलासाही त्या करतात. सर्वच प्रकारचा खुलासा करताना पूर्वीची त्यांची ताठर भूमिका मवाळ झाली आहे हे मात्र नक्की.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?