कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात असून हवामान बदल, अतिवृष्टी आणि निकृष्ट खतांच्या वापरामुळे उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला तातडीने नुकसानभरपाई जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी आयुक्तालयात कोकणातील आंबा बागायतदारांच्या (financial condition) समस्यांवर आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली २२० रुपयांची भरपाई अपुरी असून ती शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचे त्यांनी सांगितले. उत्पादनात ८० ते ९० टक्क्यांपर्यंत घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निकृष्ट खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. कारवाई न झाल्यास देवगड जामसंडे आणि रत्नागिरी येथे होणाऱ्या बैठकीत कंपन्यांविरोधात कठोर निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. द्राक्ष पिकाच्या धर्तीवर आंब्यासाठीही ‘पीक संरक्षण वेळापत्रक’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामुळे अनावश्यक निविष्ठांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी आणि प्रशासनासोबत झालेल्या बैठकीतही शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा पुढे आला. बाजारात येणाऱ्या आंब्याला योग्य दर मिळावा यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. व्यापाऱ्यांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर साखर उद्योगातील प्रलंबित देयकांवरही त्यांनी सरकारवर टीका केली. साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना १४ दिवसांत पैसे देणे कायद्याने बंधनकारक असतानाही दोन महिन्यांनंतरही देयके प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. विलंब झाल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याचे न्यायालयाचे आदेश असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. साखर आयुक्तांनी कारवाई न केल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला.
युद्धाच्या परिस्थितीचा आधार घेत व्यापाऱ्यांकडून आंबा उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत त्यांनी इशारा दिला की, परराज्यातील आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून विकला गेला तर अशा गाड्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आठ दिवसांनंतरही प्रलंबित असल्याने प्रशासनाने तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा
SBI ग्राहकांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ वेळेत तात्पुरत्या सेवा बंद राहणार
सांगलीत भोंदूबाबाची एन्ट्री; स्मशानभूमीत आढळली काळी बाहुली अन् सुया, नागरिकांमध्ये दहशत
GPayचं हटके फीचर! आता बँक अकाउंटशिवाय करा UPI पेमेंट; पॉकेट मनी आहे तरी काय?