उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्रच नंबर वन मुख्यमंत्र्यांचा विश्वास?

राज्यातील उद्योग बंद होत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी काहूर उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उद्योगधंद्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर एकवर होता आणि कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. राज्यातील उद्योग धंदे बंद होत असल्याबाबत संसदेत देण्यात आलेल्या माहितीवरून विरोधकानी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून समाज माध्यमावरून एक पत्र लिहिले असून, त्यात छत्रपतींचा महाराष्ट्र उद्योगांच्या बाबतीत यापुढेही नंबर एकवरच राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभेत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यातील ३६हजार २११उद्योग- कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती.त्यांनतर काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, (Devendra Fadnavis) त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच असल्याचे प्रारंभीच स्पष्ट करीत फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांच्या वाटचालीचा विस्तृत आराखडा पवार यांच्यासमोर मांडला आहे.

मुळात ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील ७६ टक्के या डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत अशा असतात. ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, (Devendra Fadnavis) तरच इतर तपशील मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर पारदर्शीपणे उपलब्ध आहे. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : mcacdm.nic.in/data-trends ) आपल्याला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक १ वर होता आणि कायम क्रमांक१ वरच राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

देशात एकूण ३१लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे २१ लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत. सन २०१५-१६ मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या ६ लाख ७८ हजार ७६८ इतकी होती, ती आता २१ लाख १७हजार ७४७ इतकी आहे. म्हणजेच गेल्या १० वर्षांत मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपट्टीहून अधिक वाढ झाल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे. आजही देशात सर्वाधिक ३लाख ९६हजार २११ कंपन्या महाराष्ट्रात असून त्याखालोखाल दिल्लीत २लाख ७२हजार तर तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून तेथे एक लाख ८५हजार कंपन्या आहेत.

करोना काळ वगळता सरासरी २० ते २३ हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.त्यामध्ये ७६ टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), १२ टक्के कंपन्यांचे एकत्रिकरण आणि २ टक्के कंपन्या विसर्जित झालेल्या आहेत. सन २०१९-२० या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून ६लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.

दरवर्षी सुमारे १ लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. सन२०२५-२६मध्ये राज्यात ४१ हजार ५२५ तर दिल्लीत २०हजार,उत्तर प्रदेश मध्ये २७ हजार कंपन्यांची नोंदणी झाल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की चाकण मध्ये उद्योगांच्या काही समस्या असून त्या सोडवण्यासाठी उद्योग मंत्री उदय संबंध यांना तेथे लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसेच एमआयडीसीच्या पुढाकाराने कालच जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे.(Devendra Fadnavis) सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक एकवर आपण आहोत आणि राहू अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?