इचलकरंजीत धक्कादायक प्रकार राजाराम स्टेडियममध्ये नशेच्या इंजेक्शनच्या कुप्या आढळल्या पोलिस भरतीतील तरुणांचे भविष्य धोक्यात?

इचलकरंजी पोलिस भरतीसह विविध मैदानी स्पर्धांच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी आणि तरुण ज्या राजाराम स्टेडियममध्ये दररोज सराव करतात, (Ichalkaranji) त्याच मैदानाच्या आवारात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टर्मिन इंजेक्शनच्या कुप्या, सीरिंज आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले आहे. स्टेडियममधील मोडकळीस आलेल्या स्वच्छतागृहांसह बंदिस्त आणि निर्जन भागात हे साहित्य दिसले.

सरावाच्या नावाखाली येणाऱ्या अल्पवयीन मुलांसह तरुणांपर्यंत नशेचे इंजेक्शन पोहोचत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. (Ichalkaranji) राजाराम स्टेडियमवर दररोज मोठ्या संख्येने तरुण पोलिस भरती, सैन्य भरती तसेच विविध मैदानी स्पर्धांसाठी धावण्याचा आणि शारीरिक क्षमतेचा सराव करतात. शहरातील विविध भागांतून होमगार्ड तसेच खासगी अकॅडमीचे प्रशिक्षक येथे तरुणांना प्रशिक्षण देतात. स्टेडियम परिसराची पाहणी केली असता नशेच्या इंजेक्शनच्या वापराचे धक्कादायक पुरावेच समोर आले.पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी किंवा तत्काळ ऊर्जा मिळविण्याच्या नावाखाली कोणती औषधे दिली जातात, याची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

एखाद्या व्यक्तीने अधूनमधून इंजेक्शन घेतल्यास एखादी-दुसरी कुपी किंवा सीरिंज आढळण्याची शक्यता असते. मात्र, स्टेडियमच्या निर्जन भागात मोठ्या प्रमाणात कुप्या आणि सीरिंज आढळल्याने या प्रकाराची व्याप्ती तपासण्याची गरज आहे. हा साठा नेमका किती दिवसांपासून आहे, येथे कोण येऊन इंजेक्शन घेतात, इंजेक्शन कोठून आणले जातात आणि त्यांचा पुरवठा कोण करतो, (Ichalkaranji)याचा छडा पोलिसांनी लावणे आवश्यक आहे. मैदानी सराव घेणाऱ्या काही प्रशिक्षकांकडूनच टर्मिन इंजेक्शनचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. दररोज सरावासाठी येणाऱ्या तरुणांकडून उत्तेजक म्हणून त्याचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे. या संशयाला अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी अल्पवयीन मुलांपर्यंत इंजेक्शन पोहोचत असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांसह महापालिका प्रशासनाने स्टेडियम परिसरातील प्रकाराची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?