भाजपच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीत माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने राज्य भाजपमध्ये साहजिकच प्रतिक्रिया उमटली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पवार यांना (Bharti Pawar) आधी केंद्रात राज्यमंत्रीपद तर आता उपाध्यक्षपद अशी दुहेरी संधी मिळाल्याने त्यांना पक्षात एवढे महत्त्व का, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

लोकसभेच्या २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉ. भारती पवार या दिंडोरी मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. विशेष म्हणजे तेव्हा नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा महायुतीला गमवाव्या लागल्या होत्या. तरीही डॉ. पवार यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविल्याने वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत. आदिवासी समाजातील डॉक्टर तसेच महिला यातूनच भाजपने डॉ. पवार यांना २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश दिला होता. डॉ. पवार या माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या स्नुषा. राष्ट्रवादीमध्ये त्या राज्य पातळीवर पदे भूषवित होत्या. २०१४ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढविली होती. २०१९च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी पक्षाला नवा चेहरा हवा होता.(Bharti Pawar) त्यातून डॉ. भारती पवार यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात २०२१ मध्ये डॉ भारती पवार यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. करोनाच्या पाश्वर्भूमीवर आरोग्य खात्यात बदल करण्यात आले. डॉ. पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण या खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेही राज्यमंत्र्यांना अधिकार मर्यादित असले तरी साथ रोगाच्या पाश्वर्भूमीवर पेशाने डॉक्टर असलेल्या पवारांकडे आरोग्य खाते आल्याने त्यांना छाप पाडण्याची संधी होती.
लोकसभा निवडणुकीच्या आधी नाशिक जिल्ह्यात कांदा निर्यातीचा प्रश्न पेटला होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंधने आणल्याने कांद्याचे दर गडगडले. त्यातून जिल्ह्यातील शेतकऱयांमध्ये नाराजी निर्माण झाली. केंद्रीय राज्यमंत्री म्हणून डॉ. भारती पवार यांच्याकडून जिल्ह्यातील शेतकऱयांच्या अपेक्षा होत्या. परंतु, आश्वासना पलीकडे त्या फारसे काही करू शकल्या नाहीत. परिणामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. पवार यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे हे निवडून आले.(Bharti Pawar) यामुळे डॉ. भारती पवार या काहीशा मागे पडल्या होत्या. या पाश्वर्भूमीवर राज्यातून राष्ट्रीय कार्यकारिणीवर पवार यांना संधी देण्यात आल्याने भाजपमधील त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले.उत्तर महाराष्ट्र हा तसाही भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या निवडणुकीत भाजपला नाशिक जिल्ह्यात फटका बसला. आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदुत्वाला पोषक वातावरण तयार करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. आदिवासी समाज तसेच महिला व डॉक्टर असा तिहेरी फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे डॉ. भारती पवार यांच्या नियुक्तीतून स्पष्ट झाले.
हेही वाचा :
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, पण बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने राजकारणात खळबळ?
सूर्य स्वराशीत करणार प्रवेश, मेष-मकरसह या ५ राशींचे भाग्य उजळणार?