दूध महागणार १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ नवा दर किती?

मुंबईकरांच्या घरगुती बजेटवर पुन्हा एकदा महागाईचा फटका बसणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर ९ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईत दुधाचा घाऊक दर ९३ रुपयांवरून थेट १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. हे नवे दर २८ फेब्रुवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत.

मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या उत्पादन खर्चामुळे दूध उत्पादकांवर आर्थिक भार वाढत असल्याचे संघाकडून सांगण्यात आले आहे. पशुखाद्याच्या दरात सुमारे २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसह चारा, पेंड आदींच्या किमती वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. तसेच दुधाळ जनावरांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. (Milk) याशिवाय, एफडीएकडून भेसळयुक्त किंवा कृत्रिम दुग्धजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईनंतर शुद्ध दुधाची मागणी वाढल्याचेही संघाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरही दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईत सध्या दूध किती रुपयांना मिळते मुंबईत दूधाच्या प्रकारानुसार सध्याचे दर वेगवेगळे आहेत. उपलब्ध ताज्या माहितीनुसार, मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या सुट्या म्हशीच्या दुधाचा घाऊक दर सध्या ९३ रुपये प्रतिलिटर आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये हा दर ९१ रुपयांवरून ९३ रुपये करण्यात आला होता. आता १ सप्टेंबरपासून तो १०२ रुपये होणार आहे. पॅकेटबंद दुधाच्या बाबतीत, मे २०२६ मधील उपलब्ध दरांनुसार मुंबईत अमूल गोल्डची किंमत ७२ रुपये प्रतिलिटर, तर अमूल ताजाची किंमत ६० रुपये प्रतिलिटर होती. मदर डेअरी फुल क्रीम दुधाचा दरही ७२ रुपये प्रतिलिटर होता. मात्र, १ सप्टेंबरपासून होणारी ९ रुपयांची वाढ ही मुख्यतः मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या सुट्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दराशी संबंधित आहे. (Milk) त्यामुळे प्रत्येक पॅकेटबंद दूध कंपनीचा किरकोळ दर नेमका किती वाढेल, हे संबंधित कंपन्यांच्या स्वतंत्र निर्णयावर अवलंबून राहणार आहे.

सप्टेंबरपासून गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी यांसह विविध सण सुरू होणार आहेत. या काळात दूध, खवा, मिठाई, दही, तूप यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. (Milk) त्यामुळे सुट्या दुधाच्या घाऊक दरवाढीचा परिणाम किरकोळ बाजारासह दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीवरही होण्याची शक्यता आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या माहितीनुसार, नव्या दराचा कालावधी सहा महिन्यांचा असून २८ फेब्रुवारी २०२७ नंतर दराचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?

महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?

८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?