कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
“जो जे वांच्छील तो ते लाहो”असे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या पसायदानात म्हटले आहे आणि माणूस हा “सुखी माणसाचा सदरा” कुठे मिळेल काय याच्या शोधात आहे आणि तो असतो. पसायदानात म्हटल्याप्रमाणे माणसाला जे जे हवे आहे ते ते मिळाले तर सुखी माणसाच्या सदऱ्याचा शोध थांबतो. पण दुर्दैवाने दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. आणि म्हणूनच आज माणूस सुखी नाही. असा दुःखी माणूस कुठेही दिसू लागल्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे लाभ मिळत नाहीत हे वास्तव आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांनी हेच वास्तव सांगितल्यामुळे ते अधोरेखित झाले आहे इतकेच.

एक तीळ सात जणांनी वाटून खावा असे उदात्त विचार भारतीय संस्कृतीने सांगितले आहेत. तर भगवान महावीरांनी अपरिग्रह तत्त्वज्ञान सांगितले आहे. या दोन्ही विचारांना माणसाने तिलांजली दिली आहे आणि म्हणूनच माणूस सुखी नाही. पूर्वी कमी पैशात माणूस सुखी होता आज पैसा असूनही तो सुखी नाही हे डॉ. भागवत सांगतात. याचा अर्थच असा आहे की माणसाच्या सुखाच्या संकल्पना बदलल्या आहेत. (Pasayadan) त्याचप्रमाणे त्याची (लाईफस्टाईल) जगण्याची पद्धत बदलली आहे.एक तपाहून अधिक काळ देशात आणि देशातील अनेक राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पण आजही 80 कोटी जनतेला नाममात्र दरात शिधापत्रिकेवर धान्य वितरित केले जाते. म्हणजेच या मोठ्या लोकसंख्येपर्यंत विकास पोहोचलेला नाही. देशातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांची संख्या काल म्हणजे 2014 पूर्वी किती होती आणि आज किती आहे याची आकडेवारी तपासून पाहिली तर नेमके वास्तव पुढे येऊ शकते.
यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलेले भाषण हे म्हटले तर एक प्रकारचे मुक्त चिंतन आहे आणि म्हटले तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला घरचा आहेर आहे असे म्हणता येईल.शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे लाभ मिळत नसतील तर विकास संकल्पनेचा पुनर्विचार करायला हवा. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. विकासाच्या माध्यमातून या गरजा आपण भागवू शकतो का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास जात नसेल तर ते दुर्दैवी आहे असे म्हणता येईल. माणूस सुखी तर देश सुखी. अशा आशयाचे विचार डॉक्टर भागवत यांनी व्यक्त केले आहेत.
राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांनी आपल्या भाषणात विकास कामासाठी सरकारने शंभर रुपये उपलब्ध करून दिले तर विकास कामापर्यंत हे शंभर रुपये पोहोचताना अनेक ठिकाणी गळती असते आणि परिणामी एकच रुपया खाली झिरपत जातो. म्हणजे विकास कामासाठी फक्त एक रुपया मिळतो. त्यांनी सांगितलेले ते भीषण वास्तव होते. आणि आजही इतक्या वर्षांनी (Pasayadan) त्यामध्ये फार मोठा बदल झाला आहे असे म्हणता येणार नाही. कोणतेही शासन असो ते विकास व्हावा यासाठी आग्रही असते. पण शेवटचा माणूस केंद्रस्थानी ठेवून विकास कामे केली जात नाहीत. सामान्य माणसापेक्षा इतरच घटक या विकास कामाचे लाभार्थी असतात. याचा अर्थ असा की, ज्याच्यासाठी विकास तोच त्यापासून वंचित राहतो.
आजच्या माणसाने कालच्या चष्म्यातून पाहिले तर पूर्वीचा माणूस सुखी होता हे दिसून येईल. पण तो का सुखी होता याचा विचार केला गेला पाहिजे. कालच्या माणसाची सुखाकडे पाहण्याची पद्धत वेगळी होती. दृष्टी वेगळी होती. आजच्यासारख्या त्याच्या सुखाच्या कक्षा रुंदावलेल्या नव्हत्या. आजचा माणूस निखळ सुखा ऐवजी भलत्याच सुखाच्या मागे लागलेला आहे. पूर्वी स्कूटर घ्यायचा विचार डोक्यात आला की माणूस प्रथम सायकल विकत घेत होता. चार चाकी गाडी घेण्याची स्वप्न बघणारा माणूस स्वयंचलित दूध चाकी घेण्याचा विचार करायचा. आज मात्र साध्या घरात एकत्र कुटुंब पद्धतीने कुणी रहात आहे असे क्वचित पाहायला मिळते. प्रथम वन बीएचके, नंतर टू बीएचके अशी त्याची स्वप्ने वाढत जातात. आणि या निवास सुविधा, वाहन सुविधा मिळाल्यानंतर त्याचे कर्जाचे हप्ते सुरू होतात.
म्हणजे सुखाच्या मागे लागताना माणूस स्वतःच दुःखाच्या वाटा तयार करत असतो. (Pasayadan) विकासाच्या संकल्पनेचा पुनर्विचार केला पाहिजे असे जेव्हा डॉक्टर मोहन भागवत बोलत असतात तेव्हा त्यांना अपेक्षित विकास झालेला नाही असेच म्हणायचे असते. समजा शेवटच्या माणसापर्यंत विकासाचे लाभ पोहोचले आहेत. पण तरीही माणूस सुखी असणार आहे का? या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळणार नाही. कारण आजच्या माणसाची जीवनपद्धती बदलली आहे. सुख मानण्यावर असतं हे जेव्हा सामान्य माणसाला कळेल तेव्हाच तो खऱ्या अर्थाने सुखी होईल.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती