दिवाळीत गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार आंदोलनामुळे ग्राहकांचं टेन्शन वाढणार

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या गॅस वितरक संघटनांच्या आंदोलनांमुळे ऐन सणासुदीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र ताज्या अपडेटनुसार ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. 26 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये प्रस्तावित असलेल्या आंदोलनापासून LPG वितरकांच्या दोन प्रमुख संघटनांनी दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. (gas cylinders) तसेच दिवाळीच्या काळात देशभरात गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले आहे.

LPG वितरकांच्या फेडरेशन ऑफ एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स ऑफ इंडिया (FLDI) आणि ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशन (AILDF) या संघटनांनी आंदोलनाऐवजी तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याची भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे, एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (LDAI) ने 26 ऑक्टोबरला दिल्लीत एक दिवसाच्या धरण्याची घोषणा केली आहे. घरगुती LPG सिलिंडरच्या विक्रीवर वितरकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये गेल्या पाच वर्षांपासून वाढ झालेली नाही. मात्र, या काळात व्यवसाय चालवण्याचा खर्च वाढला आहे. (gas cylinders) त्यामुळे कमिशन वाढवण्यासोबतच व्यवसायातील इतर अडचणी सोडवण्याची मागणी वितरकांकडून केली जात आहे.

21 ऑक्टोबर रोजी मुंबईतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या मुख्यालयात तेल कंपन्या आणि वितरक संघटनांची बैठक झाली. या बैठकीला इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी वितरकांनी कमिशन वाढवणे, त्यांच्या संमतीशिवाय रिफिल ऑर्डरमध्ये बदल न करणे आणि इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी दबाव न आणणे अशा मागण्या मांडल्या. वितरक आणि तेल कंपन्यांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी स्पष्ट लिखित नियम तयार करण्याची मागणीही करण्यात आली.

ऑल इंडिया एचपी गॅस डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनच्या (AIHPGDA) माहितीनुसार, वितरकांनी बैठकीत वाढता खर्च, आर्थिक अडचणी आणि दैनंदिन कामकाजातील समस्यांकडे लक्ष वेधले. डिजिटल व्यवस्थेमुळे व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढली असली, तरी काही बाजारांमध्ये रिफिल सिलिंडरची विक्री घटली आहे. त्याचवेळी व्यवसायाचा खर्च वाढत असल्याने वितरकांवरील आर्थिक दबाव वाढला आहे. नवीन कनेक्शनवर असलेले निर्बंध, पेमेंटशिवाय काम करण्याची परिस्थिती आणि न विकलेला व्यावसायिक गॅसचा साठा यांमुळेही अडचणी वाढत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी वितरकांचे कमिशन वाढवण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती दिली. कमिशनमध्ये तात्पुरती वाढ करण्याबाबत शिफारस करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावरही सहमती झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या प्रस्तावाला मंत्रालयाची मंजुरी मिळणे अद्याप बाकी आहे. बैठकीच्या वेळी तेल कंपन्यांनी आपल्या वितरक आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. (gas cylinders) मात्र, परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी काही काळ लागू शकतो असेही म्हटले. AILDF ने सांगितले की, मार्चपासून एप्रिल, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरपर्यंत या समस्या तेल कंपन्या, पेट्रोलियम मंत्रालय आणि गॅस क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांसमोर सातत्याने मांडण्यात आल्या आहेत.

एकूणच, दोन प्रमुख वितरक संघटना प्रस्तावित आंदोलनापासून दूर राहिल्या असून, सणासुदीत गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र, पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यास वेळ लागू शकतो, असे संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे सिलिंडरचा तुटवडा होणारच नाही, अशी निश्चित हमी या भूमिकेतून मिळते असे समजू नये. त्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या काळात आपले नियोजन करणे चांगले राहील.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा