गुजरात टायन्सने बाजी मारली, पंजाब किंग्सला 4 विकेट राखून नमवलं

आयपीएल 2026 स्पर्धेतील 46व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर थरारक विजय मिळवत प्लेऑफच्या शर्यतीत मोठी झेप घेतली. शेवटच्या चेंडूआधी मिळालेल्या या विजयामुळे (thrilling victory) गुजरातच्या खात्यात आता 12 गुण जमा झाले असून स्पर्धेतील समीकरणे अधिक रंगतदार झाली आहेत. पंजाबने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 19.5 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात मात्र धक्कादायक झाली. कर्णधार शुबमन गिल अवघ्या 5 धावांवर माघारी परतला. त्यानंतर जोस बटलरने डाव सावरण्याचा प्रयत्न करत 26 धावा केल्या, तर साई सुदर्शनने एकाकी झुंज देत 41 चेंडूत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावत संघाला विजयाच्या दिशेने नेले. मात्र मधल्या फळीत निशांत सिंधू, राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर झटपट बाद झाल्याने सामना शेवटच्या टप्प्यात रोमांचक झाला.

अखेर शेवटच्या दोन चेंडूत गुजरातला 3 धावांची गरज असताना वॉशिंग्टन सुंदरने शानदार षटकार ठोकत सामना संपवला आणि गुजरातच्या तंबूत जल्लोष उसळला. त्याच्या एका फटक्याने पंजाबच्या हातातून विजय निसटला. याआधी नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि पंजाबला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. पंजाबची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात प्रियांश आर्य आणि कूपर कोन्नोली बाद झाले. प्रभसिमरन सिंग 15 धावांवर माघारी परतला, तर नेहल वढेरा खातेही न उघडता बाद झाला. श्रेयस अय्यरलाही 19 धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पंजाबचा डाव 35 धावांत 4 बाद अशा संकटात सापडला होता.

अडचणीत सापडलेल्या पंजाबसाठी सूर्यांश शेडगे आणि मार्कस स्टोयनिस यांनी शानदार भागीदारी करत डाव सावरला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 79 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. सूर्यांशने फक्त 29 चेंडूत 57 धावांची तडाखेबंद खेळी केली, तर स्टोयनिसने 40 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या खेळीमुळे पंजाब 20 षटकांत 163 धावांपर्यंत पोहोचला.
मात्र पंजाबची ही धावसंख्या गुजरातसमोर अपुरी ठरली आणि शेवटच्या क्षणी सुंदरच्या षटकाराने गुजरातने सामना खिशात घातला. आता गुजरातच्या या विजयामुळे प्लेऑफच्या शर्यतीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा

आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका, या महिलांचे पैसे कायमचे बंद

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? भाजप एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का ?