“सरपंच हत्या प्रकरण: संभाजीराजेंचा धनंजय मुंडेंवर तीव्र हल्लाबोल!”

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील (murder) आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी आज बीड शहरामध्ये मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मुकमोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांपैकी राज्यसभेची माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचा उल्लेख करत सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेत.

“संतोष देशमुख यांची क्रूर हत्या(murder) झाली आहे. महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे. मला बोलायला लाज वाटते पण महाराष्ट्राचे बीड झालं आहे. 19 दिवस झाले असूनही आरोपीला अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे,” असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारच्या कामकाजावर निशाणा साधला आहे.

“अजितदादा परखड आहेत असं म्हणता मग का त्यांना संरक्षण देता त्याला?” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला. तसेच उपमुख्यमंत्र्यांना, “तुम्हाला पटतंय का महाराष्ट्रमध्ये काय चालले आहे?” असा सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी केला.

मुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही यावेळेस संभाजीराजे छत्रपती यांनी एक विनंती केली. “मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कौशल्य दाखवा आणि खऱ्या आरोपीला अटक करा. कराड याला संरक्षण देणारे तिथल्या मंत्र्यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे,” असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले. तसेच त्यांनी, “या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे,” असंही आवर्जून सांगितलं.

“असल्या गोष्टी राज्याला परवडणाऱ्या आहेत का?” असा सवाल उपस्थित करताना संभाजीराजे छत्रपती यांनी थेट मुंडे बंधू-भगिनींचा उल्लेख केला. “स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही वाल्मिक कराडशिवाय. बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का?” असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला.

“बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो. स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो आहे. हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही,” असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

“असा बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. धनंजय मुंडेंची वाल्मिकीबरोबर कंपनीत भागीदारी आहे. त्यांचे सातबारा पुढे आले आहेत. त्यांना 100 टक्के माहिती आहे तो कुठे आहे,” असंही संभाजीराजे छत्रपती म्हणालेत.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ राज्यात 15 दिवस शाळांना सुट्टी

टाटा समूह पुढील ५ वर्षात टाटा ५ लाख नोकऱ्या देणार

ठरलं तर! भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला; ‘या’ नेत्याच्या नावाची घोषणा लवकरच