BSNL ची ही सेवा लवकरच होणार बंद, लाखो युजर्सवर परिणाम!

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)(BSNL) लवकरच आता त्यांची 3G सेवा बंद करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णायाचा लाखो युजर्सवर परिणाम होणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, बिहारची राजधानी पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये बीएसएनएलची 3G सेवा आता बंद केली जाणार आहे.

कंपनीने 3G सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील कंपनीने मोतिहारी, कटिहार, खगरिया आणि मुंगेर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांची 3G सेवा बंद केली आहे. त्यानंतर आता कंपनी बिहारची राजधानी पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये 3G सेवा बंद करणार आहे. जे युजर्स कंपनीची 3G सेवा वापरत आहेत, त्यांना कंपनीने 15 जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. कंपनीने युजर्सना त्यांचे सिम अपग्रेड करण्यास सांगितलं आहे. 15 जानेवारीनंतर पाटणा आणि इतर जिल्ह्यांमध्ये 3G सेवा बंद होणार आहे.

3G सेवा बंद झाल्याचा सर्वाधिक परिणाम 3G सिम वापरत असलेल्या युजर्सवर होणार आहे. 3G सेवा बंद झाल्यानंतर युजर्स इंटरनेट सेवांचा वापर करू शकणार नाहीत. ते फक्त कॉल आणि एसएमएस करू शकतील. बीएसएनएलच्या (BSNL) अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात 4G नेटवर्क अपडेट केले जात आहे. त्यामुळे 3G सेवा बंद करण्यात येत आहे. कंपनी 4G नेटवर्क अपग्रेड करण्याच्या आणि या वर्षी देशभरात 5G सेवा सुरू करण्याच्या योजनांसह पुढे जात आहे.

3G सिम वापरकर्त्यांना इंटरनेट डेटाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांना सिम बदलावे लागेल. कंपनी कोणत्याही खर्चाशिवाय 3G सिमच्या जागी 4G सिम देत आहे. भविष्यात या सिमवर 5G डेटा देखील काम करेल. वापरकर्ते बीएसएनएल कार्यालयात जाऊन त्यांचे सिम बदलू शकतात. यासाठी त्यांना त्यांचे ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल. कंपनीने देशाच्या इतर अनेक भागांमध्ये त्यांची 3G सेवा बंद केली आहे, त्यानंतर लोकांना त्यांचे सिम बदलावे लागले.

अलीकडच्या काळात सरकारी टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांचे महागडे रिचार्ज प्लॅन हे त्याचे कारण आहे. खासगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती अनेक वेळा वाढवल्या आहेत. यामुळे त्रासलेले ग्राहक बीएसएनएलची सेवा निवडत आहेत.

बीएसएनएलच्या नावाने एक बनावट वेबसाइट लोकांची फसवणूक करत आहे. ही बनावट वेबसाइट 5G टॉवर उभारण्याच्या नावाखाली अर्ज मागवत आहे आणि वैयक्तिक माहिती आणि मालमत्तेची कागदपत्रे मागत आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे आणि लोकांना चेतावणी दिली आहे की ही वेबसाइट कोणत्याही प्रकारे बीएसएनएलशी संबंधित नाही. पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

हेही वाचा :

शिक्षकी पेशाला काळिमा ; अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला अन् बंद केला दरवाजा

ठाकरे गटाच्या नेत्यांचा महायुतीत पक्षप्रवेश ?; ‘शत प्रतिशत भाजपा’ चे स्वप्न पूर्ण?

हश मनी प्रकरणात ट्रम्प जाणार तुरुंगात: जाणून घ्या अमेरिकन कोर्टाने काय म्हटले?