उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (२६ जुलै) पहाटे ६ वाजता हिंजवडी आयटी पार्क, माण आणि मारुंजी या परिसरांचा अचानक दौरा करत विकासकामांचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, प्रचंड वाहतूक कोंडी आणि पावसामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या जलसाच्यांमुळे या महत्त्वाच्या आयटी हबची प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

हिंजवडी आयटी पार्क हा देशभरात प्रसिद्ध असलेला आयटी उद्योगाचा केंद्रबिंदू असून, दररोज हजारो कर्मचाऱ्यांची येथे ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी मूलभूत सुविधा आणि शिस्तबद्ध नियोजन नसेल तर गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत होतो, याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. विकासकांनी फक्त नफा मिळवण्यासाठी बांधकामे करून जबाबदारी झटकण्याची वृत्ती सोडावी, अन्यथा कडक कारवाईला तयार राहावे, असा इशारा त्यांनी दिला.
दौऱ्यादरम्यान सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, स्थानिक अधिकारी आणि काही विकासकांना त्यांनी स्पष्ट शब्दांत खडसावत तातडीने अंमलबजावणीची भूमिका घ्यावी असे निर्देश दिले. त्यांनी म्हटले की, नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे आणि हिंजवडीसारख्या जागतिक स्तरावरील प्रकल्पाचे महत्त्व अबाधित राहावे, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
या आकस्मिक दौऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, आगामी काळात पायाभूत सुविधांच्या उभारणीत गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.