जसा सिंबा मोठा होत गेला, तसतसा खोडकर सिंबा हळूहळू शांत, (simba)समंजस झाला. तो आधारवडासारखा भासू लागला. माझ्या आयुष्यातले काही सगळ्यात सुंदर क्षण त्याच्याचबरोबरचे आहेत. माझं लग्न झाल्यावर मी सिंबाला माझ्यासोबत नव्या घरात आणलं. जणू तोच माझी सर्वात मौल्यवान संपत्ती होता.

असं नेहमीच म्हटलं जातं, की घरात एखादा पाळीव प्राणी असणं म्हणजे (simba) एक मोठी जबाबदारी. आजच्या काळात तर अनेक घरांमध्ये पाळीव प्राणी अगदी मुलांइतकेच लाडके झाले आहेत. माझ्या मते, पाळीव प्राणी सांभाळणं हे घरात मुलं असण्यापेक्षा अधिक समृद्ध आणि समाधान देणारं असतं. कारण पाळीव प्राणी कधीच मोठे होत नाहीत, आणि बोलायला लागत नाहीत . ते आयुष्यभर आपले साथीदार बनून राहतात आणि घरातील प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक गरजा पूर्ण करतात. पण यातला सर्वात दुःखद भाग म्हणजे, ते आपल्या जीवनात आनंदाचे हजारो क्षण देऊन जातात, आणि नंतर त्यांच्या अल्पायुषी अस्तित्वामुळे आपण विलक्षण दुःखात बुडून जातो.
माझ्या आयुष्यात सिंबा २०१६मध्ये आला; माझ्या वडिलांनी आमच्या कुटुंबाला दिलेली एक प्रेमळ भेटवस्तू म्हणून. मी त्याचं नाव ‘सिंबा’ ठेवलं, कारण तो खूपच निरागस, खेळकर होता आणि त्याच्यात खूप ऊर्जा होती – अगदी त्याच्या नावासारखाच, डिस्नेच्या प्रसिद्ध चित्रपटातील पात्रासारखा! तो आला तेव्हा ४० दिवसांचा होता… ते छोटंसं पिल्लू नंतर आमच्या घरातला लाडका आणि समजूतदार सदस्य झाला. त्या काळात आमचं कुटुंब खूप मोठ्या अडचणींमधून जात होतं. पण सिंबा नेहमीच आमच्या चेहऱ्यावरच्या दु:खाचाही अंदाज घेत असे आणि क्षणार्धात तो सगळं हलकंफुलकं करून टाकत असे. तो वादळासारखा घरभर धावायचा, फर्निचरचे पाय कुरतडायचा, चपला फाडायचा आणि घरात पडलेल्या कोणत्याही कपड्याला भोकं पाडायचा. त्याच्या तीन वर्षांच्या दात येण्याच्या काळात, घर आवरून ठेवणं हे माझं कामच झालं होतं, कारण कुठलीच वस्तू उघड्यावर ठेवली तर तिचं काय होईल सांगता येत नव्हतं.
जसा तो मोठा होत गेला, तसतसा खोडकर सिंबा हळूहळू शांत, समंजस झाला. तो आधारवडासारखा भासू लागला. त्याचं आरोग्य माझ्यासाठी किती महत्त्वाचं झालं होतं, हे मला कोविडच्या काळात जाणवलं. आमच्या सोसायटीचं गेट बंद असतानाही मी त्याला खाली मोकळं सोडायचे, जेणेकरून त्याला मोकळं फिरता येईल. त्याच वेळी त्याला पहिल्यांदा टिक-फिव्हर झाला. मी कामावरून धावत घरी आले आणि शहरात जो एकमेव प्राण्यांचा दवाखाना उघडा होता, तिथं घेऊन गेले.
त्यावेळी महामार्गावर पोलिसांनी अडवलं आणि वैतागून एकजण म्हणालाही, ‘‘इथं माणसं मरत आहेत आणि यांना त्यांच्या कुत्र्याची चिंता आहे!’’ पण माझ्यासाठी सिंबा तितका महत्त्वाचा झालाच होता – कदाचित त्याला माझी गरज होती, पण त्याहून जास्त मला त्याची गरज होती. माझ्या आयुष्यातले काही सगळ्यात सुंदर क्षण त्याच्याचबरोबरचे आहेत. मी रात्री उशिरा कामावरून घरी परतले, की त्याचा उजळलेला चेहरा समोर असायचा. मग माझ्या डब्यातली उरलेली गाजरं, बीटरूट आम्ही मिळून खायचो. माझं लग्न झाल्यावर मी सिंबाला माझ्यासोबत नव्या घरात आणलं. जणू तोच माझी सर्वात मौल्यवान संपत्ती होता. माझा नवरा कामावर असायचा, तेव्हा सिंबा माझा रूममेट बनला. त्यानं माझं एकटेपण दूर केलं. आम्ही एकत्र टीव्ही पाहत बसायचो आणि संध्याकाळी तो शेपूट हलवत माझ्या खोलीत यायचा आणि माझा हात तोंडात घेऊन फिरायला नेण्यासाठी आग्रह करायचा. मी त्याला ग्रूम करून फिरायला न्यायचे.
सिंबा माझ्या नवऱ्याचाही लाडका बनला, जणू आमचं अपत्यच! दररोज रात्री तो हळूहळू आमच्या पलंगावर चढायचा आणि आम्हा दोघांमध्ये येऊन बसायचा, खेळायचा आणि शेवटी गाढ झोपून जायचा. अनेक वेळा तर मला पलंगावरून बाजूला व्हावं लागायचं, आणि जमिनीवर झोपणं भाग पडायचं.
आम्ही कुठे फिरायला गेलो, तरीही तो आमच्यासोबत असे. तिथंही आम्ही हॉटेलच्या खोलीत खेळायचो आणि मग एकत्र टीव्ही पाहत झोपायचो. एक खरं, की त्याला घेऊन जायचं म्हणजे हॉटेलचे पर्याय कमी व्हायचे, आणि पाळीव प्राण्यांना पूलमध्ये नेणं निषिद्ध असायचं. पण सिंबाच्या आनंदी चेहऱ्याचं मोल पैशात कधीच मोजता आलं नसतं; मग तो इगतपुरीच्या रिसॉर्टमधला तलाव असो किंवा अलिबागच्या नागाव बीचवर लाटांमध्ये उड्या मारणं असो.
सिंबानं आम्हाला प्रेम आणि संयम याचं खऱ्या अर्थानं मोल शिकवलं. २०२४मध्ये दुसऱ्यांदा टिक-फिव्हर झाल्यानंतरही त्यानं धीर सोडला नाही. तो प्राण्यांच्या दवाखान्यात सगळ्यांत उत्साही रुग्ण असायचा. आठ महिने त्यानं मोठ्या शांततेनं ते सगळं सहन केलं, आणि अखेर एप्रिलमध्ये तो आम्हाला सोडून गेला. त्याच्या डोळ्यांत निरागसतेचा प्रकाश होता आणि त्याचं हृदय अमर्याद प्रेमानं भरलेलं होतं.
आज मला प्रश्न पडतो, तो कुठं असेल? मला जितकी त्याची आठवण येते, त्यालाही माझी तेवढीच आठवण येत असेल का? तो एक अगदी शुद्ध, पवित्र जीव होता आणि मी त्याच्यासोबत जगले हेच माझं भाग्य. मला खात्री आहे की तो आत्ताही देवाजवळ बसला असेल आणि फिरायला ने म्हणून देवाला मस्का लावत असेल.
हेही वाचा :
Hyundai Verna चा बेस व्हेरिएंटसाठी 2 लाखांचं डाउन पेमेंट केल्यास फक्त ‘एवढुसा’ असेल EMI
आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! भगवान शंकर असतील पाठीराखा, आजचे राशीभविष्य वाचा
अंघोळ करताना नियमित शरीराला साबण लावता असाल तर थांबा! त्वचेसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या