कोरोना काळापासून मुंबईपर्यंतची धाव मर्यादित झालेल्या सह्याद्री एक्स्प्रेसला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) पर्यंत पूर्ववत चालविण्याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मक संकेत दिले आहेत. (railway) त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराडसह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. मुंबईतील प्लॅटफॉर्म विस्तार, यार्ड पुनर्रचना आणि स्थानक पुनर्विकासाची कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने या गाडीच्या मूळ मार्गाचे पुनर्संचयितीकरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी अलीकडेच यासंदर्भात माहिती देताना मुंबईतील महत्त्वाची पायाभूत कामे पूर्ण झाल्यानंतर सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल, असे संकेत दिले. (railway) त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रवाशांच्या मागणीला अखेर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सह्याद्री एक्स्प्रेस ही कोल्हापूर आणि मुंबई यांना जोडणार्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे सेवांपैकी एक मानली जाते. दररोज हजारो नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण आणि पर्यटक या गाडीचा वापर करतात. विशेषतः रात्रीचा प्रवास करून सकाळी मुंबईत पोहोचण्याची सुविधा असल्याने ही गाडी पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि इतर महत्त्वाच्या स्थानकांवरील पुनर्विकास प्रकल्पांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक गाड्यांच्या मार्गात आणि वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. त्याचा फटका सह्याद्री एक्स्प्रेसलाही बसला. परिणामी, मुंबईकडे जाणार्या प्रवाशांना पर्यायी गाड्यांचा आधार घ्यावा लागत होता. (railway) अनेकवेळा आरक्षणाचा ताण वाढल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने पुढे येत होत्या. रेल्वे तज्ज्ञांच्या मते, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली आणि सातारा या औद्योगिक पट्ट्यांतील उद्योजकांसाठी तसेच मुंबईतील रोजगार क्षेत्राशी जोडलेल्या हजारो कुटुंबांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
प्रवासी संघटनांकडून स्वागत सह्याद्री एक्स्प्रेसबरोबरच कोल्हापूर-मुंबई रेल्वे सेवांची संख्या वाढविणे, अतिरिक्त डबे जोडणे आणि सणासुदीच्या काळात विशेष गाड्या चालविण्याची मागणीही त्यांनी पुन्हा एकदा पुढे केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या नजरा आता रेल्वे मंडळाच्या पुढील घोषणेकडे लागल्या आहेत. प्रवासी संघटनांनीही रेल्वे प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले आहे.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी