कोल्हापूर शहराची ‘थेट पाईप’ बंद पडली, धरणातील पाणी संपल्याने निर्णय

पावसाने दिलेली ओढ व काळम्मावाडी धरणातील कमी झालेली पाणीपातळी यामुळे तेथील थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद झाला आहे. (water) त्यामुळे पुन्हा पर्यायी शिंगणापूर योजना सुरू केली आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर या पर्यायी योजनेतूनही पाणी उपशाला मर्यादा येणार असून, पाणी कपातीचे संकट शहरवासीयांच्या डोक्यावर घोंगावू लागले आहे.

यंदा मॉन्सूनचा पाऊस सुरू झालेला नाही. धरण क्षेत्रातही तीच स्थिती असल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी वेगाने कमी झाली आहे. पातळी ५०९ मीटरपर्यंत खाली गेली आहे. परिणामी, धरणातून थेट पाईपलाईन योजनेला मिळणारे पाणी बंद झाल्याने आपोआपच उपसा बंद झाला आहे. (water) यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन योजना बंद झाली आहे. त्यातून प्रती दिन १८० एमएलडीपर्यंत पाणी मिळत होते. आता ते बंद झाल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेला पर्यायी शिंगणापूर योजना सुरू करावी लागली आहे.

या योजनेतून १०० एमएलडीपर्यंत पाणी मिळणार आहे. तसेच, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातूनही सी, डी वॉॅर्ड सोडून इतर भागांनाही काही प्रमाणात पाणी मिळण्याची शक्यता आहे. पाऊस लांबला तर नदीतील पातळी कमी होण्याची शक्यता आहे. (water) त्यावेळी मात्र महापालिकेला पाणी कपात केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.पावसाळा पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत आता नदीतील उपलब्ध पाणीसाठा पुरविण्याच्या दृष्टीने पाणी वापर जपून करण्याची आवश्‍यकता आहे. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध योग्य वापर करण्याबरोबरच पाणी वाचवण्याचे आव्हान साऱ्यांसमोरच उभे ठाकले आहे. पाऊस लांबला तर दिवसाआड पाणीपुरवठ्याचा पर्याय अवलंबावा लागणार आहे. एप्रिल अखेरीला घेतलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय सुरू ठेवला असता तर थेट पाईपलाईन योजना संपूर्ण जून महिन्यातही सुरू राहिली असती.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद