रंगातही आता राजकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

कोणताही रंग हा निसर्गाचा अविष्कार आहे. आकाशीच्या इंद्रधनुष्यातील सप्तरंग माणसाला मोहवून टाकतात. माणसाचं रंगाशी नातं अतूट आहे. हे नातं टिकवून ठेवलं नाही तर आयुष्याचा बेरंग होतो. आता राजकारण्यांनी सुद्धा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. रंगाचं राजकीय भांडवल करायला सुरुवात केली आहे. (politics) काही ठिकाणच्या रस्त्यांवर मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरून मुंबईतील सामाजिक वातावरण ढवळून निघाल आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी ते विसंगत आहे.

मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या शिवतीर्थ परिसरात सार्वजनिक रस्त्यावर एका निवासी संकुलापर्यंत पांढरे पट्टे मारण्यात आले होते. सुरुवातीला त्या निवासी संकुलातील रहिवाशांनी त्याला हरकत घेतली आणि नंतर त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरली.
आणि आता मराठी विरुद्ध जैन असे वातावरण तयार झाले आहे. असाच प्रकार गिरगावातही झाला आहे. शिवतीर्थ नजीकच्या एका निवासी संकुलामध्ये जैन मुनींचे आगमन होणार होते. जैन मुनि हे अनवाणी असतात. ते पायात पादत्राण घालत नाहीत. सध्या कडक उन्हाळ्या सारखे वातावरण आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावरून चालले तर पायांना उन्हाचे चटके बसत नाहीत. मुनीच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून हे पांढरे पट्टे मारण्यात आले होते. (politics) वास्तविक त्याला हरकत घेण्याचे कारण नव्हते आणि नाही. मारण्यात आलेल्या पांढऱ्या रंगांच्या पट्ट्याकडे दुर्लक्ष केले असते तर वादाची ठिणगी उरली नसती. पण कुणाला तरी हा पांढरा रंग खटकला आणि त्यांनी हरकत घेतली. त्यतून वाद निर्माण झाला आणि आता रंगाचे राजकारण सुरू झाले आहे.

वास्तविक पायाला चटके बसू नयेत म्हणून पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत असे यापूर्वी कधी घडलेले नव्हते. पण त्या निवासी संकुलातील काही व्यक्तींनी मुनींच्या पायांना चटके बसू नयेत म्हणून हे पांढरे पट्टे मारले होते. हे जैन मुनीनाही माहीत नव्हते. पण रंगाचे राजकारण सुरू झाल्यानंतर, तुम्ही इथे पांढऱ्या रंगाला हरकत घेता तर मग पायधुनी, मुंब्रा येथे रस्त्यावर नमाज पठण केले जाते तेथे तुम्ही हरकत का घेत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला त्याला पायधुनी, मुंब्रा येथे रस्त्यावर पांढरे पट्टे मारून दाखवा असे प्रत्युत्तर देण्यात आले. पांढऱ्या पट्ट्यावरून सुरू झालेला सांस्कृतिक वाद विकोपाला जात आहे हे लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेने या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग दिला. महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यांवर अशा प्रकारचे पांढऱ्या रंगाचे किंवा तत्सम रंगाचे पट्टे मारणे हा गुन्हा असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावरून मुंबईत सामाजिक वातावरण ढवळून निघेल, वाद विकोपाला जाईल असे कुणालाही अगदी पोलीस दलाला सुद्धा वाटले नव्हते. कारण हे सर्व पहिल्यांदाच घडत होते. मुंबईत मराठी विरुद्ध गैर मराठी असा वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मध्यंतरी मुंबईतील कबूतरखाने वादग्रस्त बनले होते. मराठी विरुद्ध जैन असा एक सुप्त संघर्ष तेव्हा उभा राहिला होता. सध्या तो बाजूला पडला आहे. पण आता रंगाचा वाद सुरू झाला आहे. या वादात उतरलेल्या दोन्हीही घटकांनी थोडेसे आत्मचिंतन केले तर, हा सांस्कृतिक वाद संपुष्टात येऊ शकतो. आज तुम्ही पांढरे पट्टे मारले, उद्या तुम्ही आमच्या खाद्य संस्कृतीवर याल, (politics) अशी भीती व्यक्त करून रंगाचे राजकारण अधिक गडद करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला असे रंगाचे राजकारण अपेक्षित नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या दोघांनीही या विषयावर भाष्य करताना सामाजिक वातावरण बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करू नये असे आवाहन केले आहे. मराठी विरुद्ध गैर मराठी असा हा रंगाचा वाद सुरू असताना दोन्ही घटकांनी पायधुनी तसेच मुंब्रा येथील मुस्लिम धर्मीयांना या वादात अप्रत्यक्षपणे ओढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मुस्लिम नेत्यांकडून त्याबद्दलच्या प्रतिक्रिया अद्याप तरी आलेल्या नाहीत.पण त्या येणारच नाहीत असे नाही. एकूणच हे रंगाचे राजकारण थांबले पाहिजे.
अन्यथा कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिल्यासारखे होईल.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?