आयसीसी टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा शेवटचा सामना 20 फेब्रुवारीला (T20 World Cup 2026) रंगणार असून यात ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार सुरू होईल. भारतीय संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भारत ज्या गटात आहे, तो खऱ्या अर्थाने ‘ग्रुप ऑफ डेथ’ ठरला आहे.
सुपर 8 मधील ए गटात भारतासोबत दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वे या संघांचा समावेश आहे. साखळी फेरीत हे चारही संघ अजिंक्य राहिले. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारताने सर्व चार सामने जिंकले, तर झिंबाब्वेने तीन विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे या गटातील प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत.

या पार्श्वभूमीवर 17 वर्षांपूर्वीचा योगायोग पुन्हा चर्चेत आला (T20 World Cup 2026) आहे. 2009 साली इंग्लंडमध्ये झालेल्या ICC World Twenty20 2009 स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ सुपर 8 मध्ये एकत्र होते. त्या वेळी भारताला सुपर 8 मधील तिन्ही सामने गमवावे लागले होते. वेस्ट इंडिजने 7 विकेट्सने, दक्षिण आफ्रिकेने 12 धावांनी आणि इंग्लंडने 3 धावांनी भारतावर मात केली होती. सलग तीन पराभवांमुळे तत्कालीन गतविजेत्या भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे तो पराभव भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.
आता पुन्हा एकदा भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज (T20 World Cup 2026)सुपर 8 मध्ये एकत्र आल्याने त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संतुलित आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत भारताने साखळी फेरीत प्रभावी कामगिरी केली आहे.
तथापि, झिंबाब्वेचा संघ कमी लेखण्यासारखा नाही. त्यांनी या स्पर्धेत (T20 World Cup 2026)ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे सुपर 8 मध्ये प्रत्येक सामना भारतासाठी कसोटीचा ठरणार आहे.
भारतीय संघ 22 फेब्रुवारीला अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, 26 फेब्रुवारीला चेन्नई येथे झिंबाब्वेविरुद्ध आणि 1 मार्चला कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यांमधील कामगिरीवरच भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग ठरणार आहे. 17 वर्षांपूर्वीचा इतिहास बदलण्याची आणि विजयी परंपरा कायम ठेवण्याची संधी भारतीय संघासमोर आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?
टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?
एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ