आज सोशल मीडियावर (social media)विविध विषयांची चर्चा सुरू असते. माहितीपर लेख फिरत असतात. त्यात राजकारणाखालोखाल जर कोणत्या विषयावर चर्चा होत असेल, तर तो विषय ‘खाणे’ हा असावा.
- डॉ. समिरा गुजर-जोशी
आज सोशल मीडियावर (social media)विविध विषयांची चर्चा सुरू असते. माहितीपर लेख फिरत असतात. त्यात राजकारणाखालोखाल जर कोणत्या विषयावर चर्चा होत असेल, तर तो विषय ‘खाणे’ हा असावा. अगणित रेसिपीज शेअर केल्या जात असतात हे तर खरंच; पण आहारशास्त्राविषयीची चर्चाही रंगात आलेली असते.
शरीराला प्रोटिन्स किती मिळायला हवेत, खाण्यामध्ये कार्ब्ज किती प्रमाणात हवेत, साखरेचं प्रमाण किती हवं, मॅक्रो आणि मायक्रो न्युट्रिएंट्स म्हणजे काय या विषयावर अक्षरशः शेकडो पॉडकास्ट आढळतील. ख्यातनाम खेळाडू, अभिनेते यांचं डाएट कसं आहे? ते नेमकं काय खातात? त्याचा त्यांना तरुण राहण्यासाठी कसा फायदा होतो? काय खावं, किती खावं आणि केव्हा खावं? अशा असंख्य गोष्टी.
या विषयावर बोलणारे काही अभ्यासक प्रसिद्ध आहेत. लाखो लोक त्यांना फॉलो करतात. त्यांची पुस्तकं वाचतात, त्यांच्या रेसिपीज करतात. उदाहरणार्थ, ‘ग्लुकोज गॉडेस’ म्हणून प्रसिद्ध असलेली एक फ्रेंच अभ्यासक जेसी इंचोस्पे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी तिनं काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. ‘ग्लुकोज गॉडेस मेथड’ हे तिच्या पुस्तकाचं नाव आहे, जे जगात बेस्ट सेलर ठरलं आहे.
अनेक अभ्यासक असताना मी जेसीचं नाव घेतलं, कारण ती महिला आहे. घरातला आहार बायका सांभाळत असताना संशोधनात मात्र पुरुष आघाडीवर असलेले दिसतात. अर्थात ऋतुजा दिवेकरसारखे सन्माननीय अपवाद आहेत. तरीही या क्षेत्रात पुरुषांचं प्रमाण अधिक आहे हे खरं; पण मैत्रिणी, मी तुला म्हटलं, की या सगळ्या आहारशास्त्रावरच्या संशोधनात अत्यंत भरीव योगदान देणारी महिला संशोधक आपल्या महाराष्ट्रातील आहे तर?
त्यांचं नाव आहे कमला सोहनी. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांची बहीण. नुकतंच त्यांनी लिहिलेलं ‘आहारगाथा – आहार व आरोग्य विचार’ हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतल्यावर तुझ्याशी ते शेअर केल्याशिवाय राहवलं नाही.
अर्थात या छोट्याशा लेखात त्यांच्याविषयी सगळी माहिती सांगता येईल असं नाही; पण निदान त्यांची ओळख आपल्याला असायलाच हवी. त्यांनी ज्या काळात संशोधन करायला सुरवात केली, तेव्हा संशोधन क्षेत्रात महिलांचा वावर फारसा नव्हता. मुलींना उच्च शिक्षण मिळणंच मुळात अवघड होतं. अगदी सी. व्ही. रमण यांच्यासारख्या नोबेल पारितोषिकानं सन्मानित शास्त्रज्ञालासुद्धा वाटत होतं, की मुली शास्त्रज्ञ बनू शकत नाहीत.
त्यांनी कमला सोहनी यांना सर्वाधिक गुण असतानाही त्या मुलगी आहेत म्हणून त्यांना टाटा संशोधन संस्थेत प्रवेश नाकारला होता. ही गोष्ट आहे सन १९३३ मधली; पण कमलानं हार मानली नाही. ‘मी इथवर आले आहे, ते परत जाण्यासाठी नाही,’ असं त्यांनी ठामपणे सांगितलं. शेवटी काही अटींवर सी. व्ही. रमण यांनी त्यांना एक वर्ष काम करायची संधी दिली.
वर्षाच्या शेवटी ‘मला यापुढे काम करण्याची परवानगी आहे की नाही?,’ असं त्या विचारायला गेल्या, तर सी. व्ही. रमण म्हणाले, ‘‘तुझी कामातली चिकाटी आणि शिस्त पाहून मला तर वाटतं आहे, की या संस्थेत केवळ मुलींना प्रवेश द्यावा.’’ कमला सोहनी या पहिल्या भारतीय महिला संशोधक आहेत. त्यांनी इंग्लंडमधील प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात आपली पीएचडी पूर्ण केली.
हेही वाचा :
एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर
कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका! तरुणावर अंदाधुंद गोळीबारासह धारदार शस्त्राने वार
सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा; शाहू महाराजांवर व्यक्तिगत टीकेचे धाडस करू नका…