इचलकरंजी : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “रंगी रंगला श्रीरंग” या भक्तिमय संध्याकाळी भावगीत व भक्तिगीतांनी रसिक प्रेक्षकांना एका अनोख्या भक्तिरसाच्या सागरात चिंब भिजवले. श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इचलकरंजी यांच्या वतीने हा कार्यक्रम श्रीमंत न. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आज रविवार दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न झाला.
सुसंस्कृत रसिकांनी हाऊसफुल्ल प्रेक्षागृहात उपस्थित राहून या भक्तिरसाने भरलेल्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमाची निर्मिती अविनाश सूर्यवंशी यांनी केली असून प्रस्तुतकर्ता म्हणून मुकुंद चौगुले, इचलकरंजी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. यामध्ये प्रमुख गायक म्हणून मुकुंद चौगुले यांनी आपली स्वरगंधाराची छाप उमटवली, तर गायिका सौ. निता ठाकूर-देशाई यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली. सहगायक सतीश यळसंगी व सहगायिका स्नेहा संकपाळ यांनी देखील अप्रतिम सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या भक्तिमय कार्यक्रमाचे निवेदन साहिल शेख यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले. विविध गीतांमधून भगवान श्रीविठ्ठलाच्या विविध रूपांची व भक्तीची सुरेल मांडणी या संध्याकाळी अनुभवता आली.
श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इचलकरंजी यांच्या सर्व शाखांमध्ये मोफत प्रवेशिका उपलब्ध करून देत, सर्वसामान्य भाविकांनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती.
“रंगी रंगला श्रीरंग” या भावस्पर्शी संध्याकाळी उपस्थित रसिकांनी मंत्रमुग्ध होऊन टाळ्यांच्या गजरात कलाकारांच्या कार्याची प्रशंसा केली. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी संगीतातून उलगडलेली ही भक्तीची अनुभूती रसिकांच्या मनावर अमीट छाप सोडून गेली.
