विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी माणुसकी फौंडेशनची मागणी – नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करा!

इचलकरंजी –
११ वीच्या प्रवेश प्रक्रियेत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या अटेमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी केवळ जात प्रमाणपत्र सादर करूनच प्रवेश द्यावा आणि नॉन क्रिमिलेअरची अट तात्काळ रद्द करावी, अशी ठोस मागणी माणुसकी फौंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीसाठी माणुसकी फौंडेशनचे संस्थापक रवी जावळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोविंदराव हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शाळा प्रशासनाने या विषयावर लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे.

सध्या इ. ११ वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स विभागातील प्रवेश प्रक्रिया सुरू असून, एस.सी./एस.टी. वगळता इतर सर्व जातींना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आवश्यक आहे. मात्र, ग्रामीण भागातील अडाणी, अशिक्षित व अल्पशिक्षित पालकांना या सर्टिफिकेटबाबत माहिती नसल्याने त्यांच्या मुलांचा प्रवेश अडचणीत आला आहे.

नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटसाठी तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला, त्याची पडताळणी, नंतर प्रमाणपत्र प्राप्त करणे या प्रक्रियेला १५ ते २० दिवस लागतात. परिणामी, प्रवेश प्रक्रिया विलंबित होत असून जुलै महिना संपत आला तरी कॉलेज सुरू झालेले नाही.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून फक्त जात प्रमाणपत्रावर प्रवेश द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी ठाम भूमिका फौंडेशनने मांडली आहे.

या शिष्टमंडळात टाकवडेचे सरपंच मनोज चौगुले, चैतन्य चव्हाण, रंकेत रॉय, प्रथमेश इंदुलकर, आनंद इंगवले, संजय पाटील, अभि शेटके, सौरभ चव्हाण, स्वप्नील पाटील, ऋषी सातपुते, अनुराग हनगंडी, अक्षय चव्हाण, सुमित पाटील आदींचा समावेश होता.

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेतलेली ही पुढाकाराची भूमिका निश्चितच स्तुत्य असून, प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.