इचलकरंजी: शहराच्या मध्यवर्ती डेक्कन चौकात एका निराधार व्यक्तीला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आल्याची घटना माणुसकीला हादरवणारी ठरली आहे. परिसरातील नागरिकांनी आणि ‘माणुसकी फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांनी त्वरित या व्यक्तीची विचारपूस करत रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे रुग्णवाहिकेला(ambulance ) घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल 2 ते 3 तास लागले.
ज्या क्षणी जीव वाचवण्याची गरज होती, त्या क्षणी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून आपत्कालीन सेवांवरील विश्वास डळमळीत होत आहे.
“जर प्रत्येक वेळेस रुग्णवाहिका(ambulance ) इतक्या उशिरा पोहोचत असेल, तर संकटाच्या क्षणी सामान्य माणसाने काय करायचं?”* असा संतप्त सवाल माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णवाहिका प्रशासनाला केला.
सुदैवाने, संबंधित व्यक्तीला आयजीएम रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून, माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची जबाबदारी स्विकारली आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण आपत्कालीन व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेऊन सुधारणा करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा अशा घटना पुन्हा होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :