कोल्हापूर ‘लढा आमच्या हक्काचा, बळीराजाच्या अस्तित्वाचा’, ‘शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध असो’… असे फलक आणि अखंड घोषणा देत शेतकऱ्यांनी ‘गरज नसलेला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करा’, अशी मागणी केली. या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती आयोजित या मोर्चाला दसरा चौकात सुरुवात झाली. व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. (Kolhapur) भर उन्हातही मोर्चात महिला, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षवेधी होता. मोर्चा मार्गावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला महामार्गासाठी प्रति कि.मी. ५४ कोटी खर्च येत असताना शक्तिपीठासाठी ११७ कोटी खर्च, हा केवळ कंत्राटदारांच्या हितासाठी आहे, असा आरोप करत हा महामार्गच रद्द करा, अशी एकमुखी मागणी यावेळी केली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.(Kolhapur) आमदार सतेज पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चात आ. जयंत पाटील, माजी आ. सत्यजित पाटील-सरुडकर, माजी आ. ऋतुराज पाटील, माजी आ. संपतबापू पाटील, विजय देवणे, संजय पोवार, गिरीश फोंडे, ए. वाय. पाटील, धैर्यशील पाटील कौलवकर, गोपाळराव पाटील, राहुल देसाई, आर. वाय. पाटील, अप्पी पाटील आदींसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाला पावणेबाराच्या सुमारास प्रारंभ झाला व दुपारी पावणेचार वाजता सांगता झाली. तब्बल चार तास हा मोर्चा सुरू होता.
महामार्गाऐवजी एक लाख कोटींचा निधी लोककल्याणकारी कामांसाठी वापरा, एजंट व अधिकाऱ्यांकडून मोठा मोबदला मिळणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या थांबवा, या प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढून ती जनतेसमोर ठेवा, जमिनीचा सर्व्हे थांबवा, महामार्गासाठी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून अलाईनमेंट झाल्याचे सरकारने स्पष्ट करावे.मोर्चात सहभागी होण्यासाठी रेड्याला घेऊन आलेल्या शेतकऱ्याला विरोध केल्याने आंदोलक व पोलिसांत वादावादी झाली. पोलिसांनी रेड्यासह शेतकऱ्याला ताब्यात घेत नंतर सोडून दिले. आ. सतेज पाटील व शेट्टी (Kolhapur) यांनी याचा संदर्भ देत पोलिसांचा काय भरवसा नाही, रेड्याला पकडून गुवाहाटीला कापायला नेतील, असे सांगताच रणरणत्या उन्हात हशा पिकला.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी