कार्ड रीड होईना, पैसे वजा होऊनही तिकीट मिळेना NCMCच्या त्रुटींमुळे वाहक हैराण

एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) कार्डमुळे एसटी प्रवासातील तिकीट व्यवस्था जलद आणि सुलभ होण्याची अपेक्षा असताना (ticketing) तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी आणि वाहक दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे. कार्ड रीड न होणे, क्यूआर कोडचा मेसेज स्वीकारला न जाणे किंवा खात्यातून रक्कम वजा होऊनही तिकीट निघत नसल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या तांत्रिक बिघाडांवर तातडीने उपाय करण्याचे अधिकार वाहकांकडे नसल्याने त्यांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

एनसीएमसी यंत्रणेतील बिघाड, संगणकीय प्रणालीतील त्रुटी तसेच नेटवर्क आणि सर्व्हरशी संबंधित अडचणी दूर करण्याची जबाबदारी तांत्रिक विभागाची असताना प्रत्यक्ष परिस्थितीत (ticketing) त्याचा भार वाहकांवर पडत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. व्यवहाराची खात्री करणे, प्रवाशांना पर्यायी तिकीट देणे आणि तक्रारी समजावून सांगणे यामुळे तिकीट वितरणासाठी अधिक वेळ लागत आहे. गर्दीच्या वेळी या समस्येमुळे वाहकांवरील कामाचा ताण आणखी वाढत असल्याचे वाहकांचे म्हणणे आहे.

एनसीएमसी सेवा नुकतीच सुरू झाल्याने सुरुवातीच्या काळात काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांच्या अडचणींची माहिती मुख्य कार्यालयाला तसेच संबंधित कंपनीला देण्यात आली असून पुढील काही दिवसांत तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, एनसीएमसी व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत तांत्रिक बिघाडांची जबाबदारी वाहकांवर ढकलू नये, अशी मागणी होत आहे. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास वाहकांनी नेमकी कोणती कार्यपद्धती अवलंबावी, (ticketing) याबाबत स्पष्ट सूचना देण्याची गरज आहे. प्रत्येक तक्रारीसाठी अधिकृत नोंदणी व्यवस्था, तक्रार क्रमांक आणि निश्चित जबाबदार अधिकारी उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच तांत्रिक समस्या निर्माण झाल्यानंतर तातडीने कार्यवाही होईल, अशी यंत्रणा उभारण्याची मागणी प्रवासी आणि वाहकांकडून होत आहे.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब