गडचिरोली : अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला(drive) देणारे अनेक पालक आपण पाहिले असतील. या अल्पवयीन मुलांमुळेच काही अपघात होताना दिसून आले. असे असताना आता गडचिरोली शहरात पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचे समोर आले आहे. शहरातील वाहतुकीच्या वाढत्या वर्दळीमुळे अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी 2 दिवसात विविध 5 ठिकाणी नाकाबंदी करत राबवलेल्या कारवाईत दुचाकी चालवणाऱ्या 24 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर थेट गुन्हे दाखल केले आहे. शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांचे धाबे दणाणले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
या अनुषंगाने शहर पोलिसांनी गुरुवार (दि.3) पर्यंत शहरातील 5 विविध ठिकाणी नाकाबंदी मोहीम राबविली. या मोहिमेअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत काही अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळून आले.
दरम्यान, या सर्वांकडे कुठल्याही प्रकारचा वाहन परवाना नसताना देखील त्यांच्या पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन(drive) वापरण्यासाठी दिल्याने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम 2019 कलम 199 (ए) अन्वये सदर 24 पालकांवर गुन्हे दाखल करत वाहने जप्त करण्यात आली.

अपघातांचे प्रमाण कमी करणे हा उद्देश
मोहिमेचा उद्देश शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करणे हा असून, पालकांनी देखील जबाबदारीने वागून आपल्या मुलांना रस्ते वाहतुकीविषयीच्या सर्व नियमांची माहिती करुन द्यावी. यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.
होऊ शकते 3 वर्षे कारावास किंवा 25 हजारांचा दंड
अल्पवयीन व्यक्तीने वाहतूक कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या पालकांना जबाबदार धरण्यात येते. सदर कलमानुसार अल्पवयीन बालकाकडून मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनाच्या मालकाला 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा 25 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय