अंबाबाई मंदिराचे संवर्धन कामाच्या पद्धती बद्दल शंका?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सध्या प्राचीन मंदिराचे संवर्धन करण्याचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.हे काम ज्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे त्या कंत्राटी कंपनीकडून मंदिराची सुरक्षितता लक्षात घेऊन काम केले जात आहे का याबद्दल गेल्या काही दिवसांपासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. (Ambabai Temple) पण त्याबद्दल समाधानकारक खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही, परिणामी भाविकांची चिंता वाढली आहे.

मंदिराच्या भोवती असलेल्या 64 योगिनींच्या एकूण मूर्तींपैकी काही मूर्ती भग्न झालेल्या आहेत. याशिवाय भोवतालच्या दगडांना छेद गेलेले आहेत. काही कठडे फुटलेले आहेत. त्याचे संवर्धन”डचमन”पद्धतीने केले जाते आहे. ही पद्धत सर्वसामान्य भक्तांना अनभिज्ञ आहे. (Ambabai Temple) काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या डचमन पद्धतीला आक्षेप घेतला आहे. हे काम सुरू असतानाच मंदिरात दक्षिण बाजूला गळती लागली आहे. सुरू असलेल्या कामाचा या गळतीशी संबंध लावला जातो आहे. अशास्त्रीय पद्धतीने काम सुरू असल्यामुळे मंदिराला कधी नव्हे ती गळती लागली असल्याचा केलेला दावा विचारात घेतला पाहिजे. मूळ मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी राज्य शासनाने 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सुरू असलेले काम आणि खर्च होत असलेला निधी याबद्दलही शंका घेतली जात आहे. खर्च होत असलेल्या निधीच्या तुलनेत काम होत असल्याचे दिसत नाही. दोन वर्षांपासून काम सुरू आहे आणि ते अद्यापही संपलेले नाही.

करवीर निवासिनी अंबाबाई चे मंदिर हे अतिरेक्यांच्या हिट लिस्ट मध्ये आहे आणि म्हणूनच केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक दरवर्षी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा विषयक स्थानिक पोलीस प्रशासनाला मार्गदर्शन करत असते. देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक या मंदिराला भेट देत असतात. असे असले तरी हे पुरातन मंदिर अद्याप “राज्य संरक्षित वास्तू यादी”मध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही बाब सुद्धा धक्कादायक म्हणावी लागेल.या संदर्भात संबंधित विभागाने एक तांत्रिक अडचण पुढे केली आहे आणि, ती दूर केल्याशिवाय हे मंदिर राज्य संरक्षित वास्तू यादीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. हे मंदिर कोणाच्या मालकीच्या जागेवर बांधण्यात आलेले आहे याचे स्पष्टीकरण संबंधित विभागाने मागितले होते. मंदिराची जागा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान देवस्थान समितीच्या नावावर आहे पण त्याला मंदिर पुरोहितांनी हरकत घेतली होती. आता सर्किट बेंच च्या एका आदेशाने ही हरकत निकाली काढण्यात आलेली आहे. आणि येत्या काही दिवसात करवीर निवासिनी अंबाबाईचे प्राचीन मंदिर”राज्य संरक्षित वास्तू”म्हणून घोषित केले जावे असे सर्किट बेंचने म्हटले आहे. त्यामुळे मंदिराच्या मालकीचा प्रश्न सुटलेला आहे, पण संवर्धनाबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या शंकांचे निरसन अद्याप करण्यात आलेले नाही.

मंदिर संवर्धनासाठी जी “डचमन” पद्धती अवलंबिण्यात आलेली आहे ती शास्त्रशुद्ध नाही.संवर्धनासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीमुळे मंदिराच्या मूळ ढाच्याला धोका होऊ शकतो. भिंतीना तडे जाऊ शकतात. विशेष म्हणजे हे काम सुरू करताना काही वास्तू स्थापत्य शास्त्रज्ञांना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. (Ambabai Temple) त्यामुळे उपलब्ध असलेला 143 कोटी रुपयांचा निधी खर्च होऊन जाईल पण झालेल्या कामाच्या दर्जाविषयक हमी देणारे कोणीतरी पाहिजे.कोल्हापुरात काही पूल तसेच काही इमारती ब्रिटिश काळात ब्रिटिश कंपन्यांच्या कडून बांधण्यात आलेल्या आहेत. त्यांना शंभर वर्षांची वॉरंटी संबंधित कंपन्यांनी दिली होती. आणि शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोल्हापुरातील संबंधित शासकीय विभागांना ब्रिटिश कंपन्यांनी आता आमची जबाबदारी संपलेली आहे असा पत्र व्यवहार केलेला आहे. तशाच प्रकारची वारंटी मंदिराचे संवर्धनाचे काम करणाऱ्या कंपनीकडून घेतली गेली पाहिजे.

हेही वाचा :

झिम्बाब्वेविरुद्धचा सामना कुठे पाहता येणार? योग्य माहिती जाणून घ्या?

आमदार नारायण कुचे यांच्या कारचा भीषण अपघात ३ जण गंभीर जखमी?

मग अट्टहास कशासाठी केला?