वेगवेगळी नाणी, पक्षी(bird), प्राण्यांचे आकार, भौगोलिक रचना, तुकडे तुकडे जोडून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या आदिवासी पद्धतीची (ट्रायबल आर्ट) ज्वेलरी सध्या कमालीची लोकप्रिय झाली आहे.
- पृथा वीर
वेगवेगळी नाणी, पक्षी(bird), प्राण्यांचे आकार, भौगोलिक रचना, तुकडे तुकडे जोडून मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या आदिवासी पद्धतीची (ट्रायबल आर्ट) ज्वेलरी सध्या कमालीची लोकप्रिय झाली आहे. विशेष म्हणजे पूर्वापार चालत आलेला कलेचा हा वारसा आदिवासी समाज अजूनही जपून आहे.
फॅशन ट्रेंडने आदिवासी ज्वेलरीला उभारी देत हा अद्भुत वारसा समोर आणला. तर ऑनलाइन मार्केटने ही कला एका विशिष्ट उंचीवर नेली. यामुळे आदिवासी दागिन्यांचे सौंदर्य, साध्या; पण विलक्षण डिझाईन्सकडे संपूर्ण जग आकर्षित झाले आहे.
प्राचीन काळापासूनच संपूर्ण जगभरातील आदिवासी समुदाय वेगवेगळ्या दागिन्यांचा वापर करतात. प्राण्यांची हाडे, दात, हस्तिदंत, दगड, टरफले, लाकूड आणि इतर नैसर्गिक साधने वापरून थक्क करणारी प्रतिभा या दागिन्यात दिसते. वेगवेगळे स्टोन, नाणी, टेराकोटा, कवड्या, हस्तिदंत, पिसे, कवच असे साहित्य वापरून नुसती ज्वेलरी तयार होत नाही, तर आदिवासी समाजाचे निसर्गाशी असणारे नाते दिसून येते.
स्टोन ज्वेलरी, बंजारा पद्धतीची ज्वेलरी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, टेराकोटा कलेक्शन अशा कितीतरी ज्वेलरीमध्ये ही किमया दिसते. उपासनेची विविध चिन्हे व आकार यामुळे ट्रायबल ज्वेलरी खूप उठून दिसते. कानातले असो की चोकर, बांगड्या असोत की नोझ रिंग, ट्रायबल ज्वेलरी ट्रेंड सेट करते. भारतात तर प्रत्येक आदिवासी समाजाची आपापल्या पद्धतीची ज्वेलरी आहे.
खासी, गारो- खासी, जैंतिया आणि गारो प्रदेशात राहणारे आदिवासी समाज जाड लाल कोरल मणींचे हार घालतात. सिक्कीममधील भुतिया जमाती दागिन्यांच्या आकर्षक आणि सुंदर डिझाईन्स तयार करण्यासाठीही ओळखली जाते. बंजारा समाजातील दागिने अत्यंत सुबक आणि प्रसिद्ध आहेत. ते रंगीबेरंगी आणि जड दागिने वापरतात.
अरुणाचल प्रदेशातील आदिवासी आपले दागिने सजवण्यासाठी बिया, पिसे, बांबू, छडी यासारख्या नैसर्गिक संसाधने वापरतात. हिमाचली समाजात चांदीच्या हंसली, चांदीच्या चोकर वापरतात. इथल्या चांदीच्या बांगड्या प्रसिद्ध आहेत. मध्य प्रदेशातील बस्तर जिल्ह्यातील आदिवासी गवत आणि मोत्यापासून दागिने बनवतात. चांदी, लाकूड, काच, मोराची पिसे, तांबे आणि रानफुले यांचा वापर केला जातो.
ट्रायबल ज्वेलरीमध्ये मोर, कासव, बैल, घोडे, हत्ती आणि सिंह, मासे, सिंह, वाघ यांसारखे प्राण्यांच्या आकाराचे डिझाइन बघायला मिळतात आणि ही डिझाइन खरच खूप सुंदर दिसतात. ट्रायबल ज्वेलरीमधली नाण्यांची ज्वेलरी तर अत्यंत आकर्षक आणि वेगळी आहे. कालौघात बदल होत गेले; पण या दागिन्यांची झलक ऑनलाइन बघायला मिळते.
हेही वाचा :
अंपायरशी भांडण विराटला भोवलं, BCCI ने सुनावली ही शिक्षा
विशाल पाटलांचं ठरलं, आता माघार नाहीच..! ‘या’ चिन्हावर लढणार तर शेट्टींना पुन्हा…
निवडणुकीला राहून चूक केली, शाहू महाराजांचा पराभव नक्की होणार : हसन मुश्रीफ