गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये स्पष्ट सांगितलं, ‘जडेजा तू फार…’

लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड संघाने तोंडचा घास हिरावून घेतल्यानंतर मोहम्मद सिराज खाली बसून बॅटवर हात आदळत आपला संताप व्यक्त करत असताना, दुसऱ्या बाजूला रवींद्र जाडेजा निराशेत मान खाली घालून उभा होता. मोहम्मद सिराजचा संताप अपेक्षित होता, मात्र रवींद्र जडेजाच्या(cricketer) निराशेसोबत त्याची तुलना होणं अशक्य होतं.

याचं कारण रवींद्र जडेजाने सामन्यातील आव्हान कायम ठेवलं होतं. आपला संयम आणि भागिदारी यांच्यासह त्याने भारतीय संघ अजूनही सामना जिंकू शकतो ही आशा कायम ठेवली होती. पण सिराजच्या विकेटनंतर या सर्व आशा मावळल्या.

रवींद्र जडेजाने(cricketer) 181 चेंडूत 61 धावा केल्या. त्याने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहसह तीन तास खिंड लढवली. पण त्याचे प्रयत्न कमी पडले आणि भारतीय संघाने 22 धावांनी सामना गमावला. अनेकांनी बुमराहच्या विकेटनंतर रवींद्र जडेजाने मोठे फटके खेळायला हवे होते असं मत मांडलं. पण अष्टपैलू जडेजा आपल्या वेगाने आणि संयमाने खेळत होता. जर सिराज दुर्दैवीपणे बाद झाला नसता तर कदातिच शेवट वेगळा असता.

भारतीय ड्रेसिंग रुमच्या मतेही रवींद्र जडेजा वेगळ्या प्रकारे फलंदाजी करु शकत होता असं नव्हतं. सामन्यानंतर गौतम गंभीरने ड्रेसिंग रुममध्ये दिलेल्या भाषणातून हे स्पष्ट झालं आहे. गौतम गंभीरने रवींद्र जडेजावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या “द एमव्हीपी एफटी. रवींद्र जडेजा” या व्हिडिओमध्ये, गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये संघाला संबोधित केले आणि या खेळीचे वर्णन अविश्वसनीय लढाई असं केलं. “ही एक चांगली लढाई होती. जड्डूने दिलेला लढा जबरदस्त होता,” अस त्याने सांगितलं आहे.

भारत 193 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करत होता. मात्र आघाडीचे फलंदाज एकामागोमाग तंबूत परतले. 40 षटकांतच आठ विकेट्स गेल्या. सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या जडेजाने(cricketer) संयम आणि दृढनिश्चयाने फलंदाजी केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यासोबत त्याने महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या तिघांनी 34 षटकांपेक्षा जास्त काळ इंग्लंडच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला आणि त्यानंतर सिराज शेवटचा विकेट म्हणून बाद झाला आणि भारताचा डाव 74.5 षटकांत 170 धावांवर संपला.

गंभीरच्या वक्तव्यातून केवळ धावसंख्येबद्दलच नव्हे तर कठीण परिस्थितीत जडेजाने आणलेल्या वृत्तीबद्दल त्याचे कौतुक दिसून येते. सौराष्ट्रसाठी स्थानिक क्रिकेट खेळल्यापासून जडेजाला ओळखणारे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी जडेजाच्या स्वभावाकडे लक्ष वेधलं.

“मला वाटतं तो नेहमीच दबावात खेळण्यासाठी तयार असतो. इतका अनुभव असताना तो नेहमीच संघाला आव्हानात्मक स्थितीत गरज असेल त्याप्रमाणे खेळी करतो. तो संघासाठी खूप मौल्यवान खेळाडू आहे,” असं सीतांशू कोटक यांनी सांगितलं.

भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशाटे यांनी जडेजाच्या फलंदाज म्हणून केलेल्या प्रगतीवर भाष्य केलं. “त्याची फलंदाजी एका वेगळ्याच पातळीवर पोहोचली आहे. गेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने आणलेला सातत्य आणि शांतपणा योग्य फलंदाजासारखा दिसतो,” टेन डोशाटे म्हणाले.

जडेजासोबत महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या अष्टपैलू गुणांवर भर दिला. “त्याच्यासारखा खेळाडू मिळणे खूप कठीण आहे. आमच्या संघात असा खेळाडू असणे हे आमचे भाग्य आहे,” असं सिराज म्हणाला.

शुभमन गिलने जडेजा हा भारताच्या सर्वात मौल्यवान खेळाडूंपैकी एक असल्याचे म्हटले. “फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील त्याचं योगदान दुर्मिल आहे. जड्डू भाईने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती अभिमानास्पद कामगिरी होती. त्याने दाखवलेले चारित्र्य आणि धाडस जबरदस्त होते,” असं गिल म्हणाला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-2 ने पिछाडीवर आहे. चौथी कसोटी 23 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये सुरू होत आहे, जिथे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय आवश्यक आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध कंपनीचे CEO आणि HR यांच्या कॉन्सर्टमधील ‘त्या’ व्हिडीओने जगभरात खळबळ!

मोठी बातमी! अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबादनंतर ‘या’ शहराचे नाव बदलणार

‘2-3 लोकांना कानाखाली…’महाराष्ट्रातील मराठी-हिंदी वादात रेणुका शहाणेंची उडी!