कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचे पडसाद कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या अर्थात गोकुळ च्या राजकारणावर उमटलेले दिसतात. पुढील वर्षी होणार असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे(election) ढोल आत्तापासूनच वाजू लागले आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या पॅनल मध्ये निवडणूक होणार असली तरी खरी लढत नेतृत्वासाठी महायुती विरुद्ध महायुती यांच्यात होणार आहे. महाडिक गटाला एकाच वेळी हसन मुश्रीफ, तसेच पारंपरिक राजकीय शत्रू सतेज पाटील या दोघांशी लढावे लागणार आहे.

गोकुळ दूध संघावर बरीच वर्षे महाडिक गटाची सत्ता होती. चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत(election) काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ या दोघांनी महाडिक गटाचा दारुण पराभव केला होता. हा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता. पाटील आणि मुश्रीफ हे दोघेही तेव्हा महाविकास आघाडीत मंत्री होते. त्यानंतर जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर तीन जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली आणि अजितदादा गत हा भारतीय जनता पक्षाच्या प्रभावाखाली गेला. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात आश्चर्यकारक बदल झाले आणि त्याचे दृश्य परिणाम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या राजकारणावर झाले. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नव्हता.
अरुण डोंगळे यांचे राजीनामा नाट्य दोन महिन्यापूर्वी चांगलेच गाजले होते. गोकुळ दूध संघाच्या सत्ताकारणात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी थेट हस्तक्षेप केला आणि नवीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. याचा अर्थ हा गोकुळ दूध संघ महायुतीकडे गेला असा होतो.
मुश्रीफ हे महायुतीमध्ये विद्यमान मंत्री आहेत. महाडिक गटाचे धनंजय महाडिक हे भारतीय जनता पक्षात आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार आहे. पण या निवडणुकीत गोकुळ दूध संघाचे नेतृत्व कुणाकडे हा कळीचा मुद्दा बनला आहे. कारण कोणत्याही स्थितीत महाडिक गटाला गोकुळ दूध संघावर पुन्हा एकदा आपली सत्ता आणावयाची आहे. म्हणून त्यांना या निवडणुकीचे नेतृत्व स्वतःकडे हवे आहे.
सध्या हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आहेत आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत(election) संचालकांची संख्या 21 वरून 25 वर नेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्याला महाडिक गटाच्या शौमिका महाडिक यांनी विरोध केला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन संचालकांची संख्या वाढवण्याचा निर्णय झालेला नाही म्हणून आमचा त्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजे आत्तापासूनच महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. मुश्रीफ यांना या संघावर आपलेच वर्चस्व ठेवावयाचे आहे.
महायुती अंतर्गत महाडिक विरुद्ध मुश्रीफ असा संघर्ष उभा राहिला असून महायुतीच्या नेत्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून
हा संघर्ष संपुष्टात आणला पाहिजे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कदाचित ते होईलही. तथापि महाडिक यांना गोकुळ दूध संघावर त्यांचा अध्यक्ष आणावयाचा असल्याने ते मुश्रीफ यांचे वर्चस्व मान्य करणार नाहीत. एकूणच गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशीच लढत पाहायला मिळणार आहे. याला “वरून किर्तन, आतून राजकीय तमाशा” असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
हेही वाचा :
सैयारा चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, मोडले कमाईचे सर्व रेकॉर्ड्स
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सकारात्मक होणार आज शेअर बाजाराची सुरुवात
रमीचा डाव उलटला! कोकाटेंच्या राजीनाम्याची तारीख ठरली? सकाळी नऊ वाजता…