दुर्दैवी वैष्णवी हगवणे हिचे मृत्यू पश्चात चारित्र्य हनन!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वैष्णवी हगवणे(Vaishnavi Hagavane) आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे. राज्य शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. विरोधकांनी राज्या महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला आहे. या घटनेतील सह आरोपी निलेश चव्हाण अद्याप सापडलेला नाही.

याशिवाय आणखी काही संशयित आरोपी निष्पन्न होणार आहेत. या एकूण पार्श्वभूमीवर हगवणे कुटुंबीयांच्या बचावासाठी न्यायालयात काही मुद्दे मांडताना त्यांच्या वकिलांनी वैष्णवी हगवणे(Vaishnavi Hagavane) हिच्या मृत्यू पश्चात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा केलेला प्रयत्न हा अक्षम्य आणि अतिशय संताप जनक आहे. त्यांचे हे कृत्य वकिलांसाठी असलेल्या कोड ऑफ कण्डक्टमध्ये, आचारसंहितेमध्ये बसत नाही. त्यामुळे वकिलांच्या राज्य शिखर संघटनेने यावर आपले मत व्यक्त करणे आवश्यक आहे.

घटस्फोटाच्या किंवा पोटगीच्या दाव्यात प्राथमिक स्तरावर संबंधित महिलेला तिच्या नवऱ्याकडून वकिलांच्या माध्यमातून नोटीस बजावली जाते. ह्या नोटेशन संबंधित महिलेच्या चारित्र्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाष्य करता येत नाही. नवऱ्याकडून मिळालेली पुराव्यासहितची चारित्र्य विषयक माहिती सुद्धा नोटीसीत देता येत नाही.

अशा प्रकारच्या नोटीस मध्ये संबंधित महिलेच्या चारित्र्यावर काही लिहिल्यामुळे वकीलच अडचणीत आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. संबंधित महिलेने नोटीसीतील बदनामी कारक मजकूर याबद्दल वकिलांच्या शिखर संघटने कडे तक्रार केली तर त्याची दखल घ्यावी लागते. इतकेच नाही तर तसेच सिद्ध झाले तर वकिलीची सनद रद्द किंवा निलंबित होऊ शकते. म्हणूनच अशा प्रकारच्या प्राथमिक नोटिशीमध्ये चारित्र्य विषयक मजकूर वकिलांच्याकडून लिहिला जात नाही.

वैष्णवी हगवणे(Vaishnavi Hagavane) प्रकरणात न्यायालयीन प्राथमिक सुनावणी मध्ये संबंधित आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना दुर्दैवी वैष्णवीच्या चारित्र्यावर थेट वक्तव्य केले आहे आणि ते न्याय तत्त्वाला सोडून आहे. हगवणे कुटुंबीयांच्या तोंडी माहितीवरून किंवा मोबाईल चॅटिंग चा आधार घेऊन दुर्दैवी वैष्णवीच्या चारित्र्यावर भर न्यायालयाचा संशय घेणे हे वकिलांसाठी असलेल्या कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन करणारे आहे. या वकिलांनी यापूर्वीही केलेल्या काही घटना या निमित्ताने पुढे आलेल्या आहेत. या घटना त्यांच्या नैतिकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत.

कोणत्याही पुराव्याशिवाय न्यायालयाच्या प्राथमिक सुनावणीत आरोपींच्या बचावाची बाजू भक्कम करण्यासाठी संबंधित महिलेच्या चारित्र्याबद्दल संशय व्यक्त करणे हे अनुचित आहे. वास्तविक अशा संवेदनशील प्रकरणात आरोपींच्या बचावासाठी युक्तिवाद करताना वकिलांनी आपले वकिली कौशल्य वापरावयाचे असते. कायद्यातील तरतुदीवर बोट ठेवावयाचे असते. महाराष्ट्रात यापूर्वी अशी संवेदनशील प्रकरणे घडली आहेत पण तेव्हा वकिलांनी चुकीचा युक्तिवाद केल्याचे ऐकिवात नाही. संबंधित वकिलांनी आपले वकिली कौशल्य आणि बुद्धिमत्ता वापरलेली आहे.

वैष्णवीच्या(Vaishnavi Hagavane) चारित्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांच्या विरुद्ध वैष्णवीच्या कुटुंबीयांकडून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या वकिलांच्या शिखर संघटने कडे आता तक्रार दिली जाणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या श्रमती अंजली दमानिया यांनी हगवणे कुटुंबीयांच्या वतीने कोर्टात बचावासाठी उभा राहिलेल्या वकिलांवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय इतरही महिला संघटनेच्या वतीने संबंधित वकिलांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

वैष्णवी हगवणे हिला संविधानाने आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार दिला होता. घटनेने हा अधिकार सर्वांनाच दिलेला आहे. पण वैष्णवी चा नवरा, दीर, सासू, सासरे, ननंद या सर्वांनी तिचा हा अधिकारच काढून घेतला होता. आता तर वैष्णवी ही या जगात नाही. तिने मृत्यूला कवटाळले आहे. आणि त्याला तिच्या सासरची मंडळी जबाबदार आहेत.

एकूणच हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. ते राज्यभर गाजते आहे. या प्रकरणाच्या न्यायालयीन प्राथमिक सुनावणी कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. अशावेळी हगवणे कुटुंबीयांच्या बचावासाठी न्यायालयात उभ्या असलेल्या संबंधित वकिलांनी युक्तिवाद करताना तारतम्य बाळगणे आवश्यक होते. हगवणे कुटुंबीयांचा गुन्हा सौम्य करण्यासाठी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रतिकूल भाष्य करणे हा सुद्धा नैतिक पातळीवरील गुन्हाच आहे. या प्रकरणात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा या वकिलांच्या संघटनेने “व्यक्त”होणे आवश्यक आहे. तसे झाले तर सर्वसामान्य जनतेचा न्यायालयावरील विश्वास आणखी दृढ होणार आहे.

हेही वाचा :

धक्कादायक! अडीच हजार सरकारी महिला कर्मचारी निघाल्या लाडक्या बहिणी

सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, चांदीच्या किंमतही नरमल्या!

विराट कोहलीकडून ज्यूनियर खेळाडूचा अपमान? ‘हा तर…’ VIDEO व्हायरल!