मुंबईची हाराकिरी! आयपीएलमधून आऊट होण्याचा पहिला मान मुंबईला

सात पराभवांमुळे मुंबईचा खेळ संपलाच होता. आज घरच्याच मैदानावर फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे आयपीएलमधून आऊट होणारा मुंबई (mi)पहिला संघ ठरला. कोलकात्याच्या फलंदाजांनीही मुंबईच्या माऱयापुढे गुडघे टेकले होते. वेंकटेश अय्यरच्या 70 धावांच्या स्फूर्तिदायक खेळीने कोलकात्याला विजयाची ऊर्जा दिली. कोलकात्याच्या गोलंदाजीसमोर दिग्गज फलंदाजांनी मान टाकल्यामुळे मुंबईला 24 धावांनी हार पत्करावी लागली.

कोलकात्याचे 170 धावांचे आव्हान मुंबई(mi) सहज गाठेल अशी साऱयांना आशा होती. पण रोहित शर्मा आणि इशान किशनच्या अपयशी सलामीने मुंबईचा कणाच मोडला. आयपीएलमध्ये विशेष काही करू न शकलेल्या मिचेल स्टार्कला पहिल्याच षटकात इशानने षटकार आणि चौकार ठोकत झंझावाती सुरूवात करून दिली. पण स्टार्कने चौथ्याच चेंडूवर इशानचा त्रिफळा उडवला. मग रोहित शर्मानेही आपल्या अपयशी फलंदाजीची मालिका पुढेही चालू ठेवली. फलंदाजीत न चमकलेल्या सुनील नारायणने गोलंदाजीत चमक दाखवताना रोहित आणि नमन धीरला बाद केले. सुनीलसह वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसलनेही मुंबईला धक्क्यांमागून धक्के देत 6 बाद 71 अशी बिकट अवस्था करत कोलकात्याला विजयी ट्रकवर आणले. मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने टीम डेव्हिडच्या साथीने 49 धावांची भागी रचून मुंबईला विजयाची आशा दाखवली, पण ही जोडी फुटताच मुंबईच्या आशेचा स्टार्कने स्पह्ट करत चार चेंडूंत 3 विकेट घेत कोलकात्याच्या सातव्या विजयावर आणि मुंबईच्या आठव्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. आयपीएलमध्ये 51 सामन्यानंतरही एकही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरलेला नाही. मात्र आठ पराभवानंतर मुंबई आयपीएलमधून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. आता यापुढे जर आणि तरचे कोणतेही समीकरण मुंबईला लागू पडणार नाही.
तत्पूर्वी मुंबईच्या वेगवान गोलंदाजीसमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती. अपवाद फक्त वेंकटेश अय्यर आणि मनीष पांडेचा. नुवान तुषाराच्या भेदक सुरुवातीमुळे कोलकात्याची 5 बाद 57 अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मुंबईचा झंझावात पाहता कोलकाता शंभरीही गाठण्याची शक्यता नव्हती. पण तेव्हा वेंकटेश अय्यर कोलकात्याच्या मदतीला बालाजीसारखा उभा राहिला आणि त्याने मनीष पांडेच्या साथीने 83 धावांची भागी रचून संघाच्या जीवात जीव आणला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे कोलकाता 200 चा जादुई आकडा गाठण्याची शक्यता निर्माण झाली होती. हार्दिक पंडय़ाने मनीषला बाद करून ही जोडी पह्डली आणि त्यानंतर तळाच्या फलंदाजांना बुमराने टिपून कोलकात्याला 169 वर रोखले. वेंकटेश अय्यरने 52 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकार खेचत 70 धावांची घणाघाती खेळी केल्यामुळे कोलकात्याने अपेक्षेपेक्षा मोठी मजल मारली. मुंबईकडून तुषारा-बुमराने प्रत्येकी 3 विकेट टिपले. तसेच बुमराने पुन्हा पर्पल पॅप आपल्या डोक्यावर आणली.


मुंबई इंडियन्सच्या पाठीशी मुंबईकर

मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपल्यातच जमा असूनही आज आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. एवढेच नव्हे तर तिकिटांचा काळाबाजारही सुरू होता. हार असो किंवा जीत, आम्ही नेहमीच मुंबईच्या पाठीशी आहोत आणि राहणार असल्याची ग्वाही मुंबईकर चाहत्यांनी दिली. आजवर मुंबईने आयपीएलमध्ये आम्हाला आनंदच दिला आहे. हा मोसम आमचा नाही म्हणून आम्ही संघाच्या विरोधात उभे राहावे का? खेळ म्हणजे यश-अपयश आलेच. उर्वरित सामन्यातही आम्ही मुंबईला साथ देणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा :

प्रचाराच्या धुरळ्यात विकास आणि महागाईचे मुद्दे गायब

IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण

मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत, ‘हा’ मोठा नेता सोडणार पक्ष